Sachin Mote Shared Atul Parchure Memory : दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांचं गेल्या वर्षी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झालं. अतुल यांनी कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन पुन्हा रंगभूमीवर कमबॅक केलं होतं. पण अचानक आलेल्या आजारपणात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली. अतुल परचुरेंच्या जाण्यानंतर राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली गेली. त्यांच्या निधनंतर अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त करत सोशल मीडियावर त्यांना आदरांजली वाहिली होती. आजही अनेकजण अतुल यांच्या आठवणी शेअर करत असतात.

सचिन मोटेंकडून दिवंगत अभिनेते अतुल परचुरेंचं कौतुक

अशातच आता दिग्दर्शक आणि निर्माते सचिन मोटे यांनी अतुल यांच्या आठवणीत एक किस्सा सांगितला आहे. शिवाय त्यांनी अतुल हा माझ्या आयुष्यातील अनेक यशस्वी गोष्टींमध्ये माझ्याबरोबर असलेला माणूस असल्याचंही म्हटलं. बोलभिडूशी साधलेल्या संवादात त्यांनी असं म्हटलं की, “अतुल परचुरे हा माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीतला खूप यशस्वी गोष्टींमध्ये माझ्याबरोबर असलेला माणूस आहे. म्हणजे ‘देवपावले’, ‘नकळत’च्या वेळेस अतुल परचुरे माझ्याबरोबर होता. त्यानंतर मी एक हिंदी मालिका लिहायला लागलो; ‘आर.के. लक्ष्मण की दुनिया’ त्याचा अतुल हीरो होता. त्याचे जवळपास ४५० भाग आम्ही दोघांनी एकत्र केले.”

सचिन मोटेंनी सांगितला अतुल परचुरेंचा अमेरिकेतील किस्सा

यापुढे सचिन मोटे म्हणाले की, “तो माझ्याविषयी खूप चांगलं बोलायचा. मी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत गेलो होतो, त्यावेळी अतुल परचुरे तिथे स्किट करायला होता. तो वेगळं स्किट करायला आला होता; पण आनंद इंगळे आणि क्षिती जोगचा तेव्हा विझा झाला नाही. त्यामुळे तेव्हा अतुलने तिथल्या एका अभिनेत्रीबरोबर माझं स्किट सादर केलं. त्यानंतर तो मला म्हणाला तू पहिल्यांदा अमेरिकेत आला आहेस ना? आता तू खर्चाला मागे-पुढे पाहू नको”. म्हणून मला त्याने तिथला मॉल दाखवला. तिथे शॉपिंगला घेऊन गेला. एक बॅग खरेदी कर म्हणाला.”

उपचार सुरू असतानाच अतुल परचुरेंची प्राणज्योत मालवली

दरम्यान, अतुल परचुरेंनी अत्यंत जिद्दीने कर्करोगावर मात केल्यानंतर पुन्हा काम सुरू केलं होतं. ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातून प्रेक्षकांसमोर येण्याची त्यांची जय्यत तयारी सुरू होती. या नाटकाची तालीम सुरू असतानाच त्यांना पोटाचा त्रास जाणवू लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्रास बळावल्याने त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या आजारपणातूनही बाहेर पडून ते पुन्हा रंगभूमीवर परततील अशी आशा त्यांच्या सहकाऱ्यांना आणि मित्रपरिवाराला होती. मात्र या आजारावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांच्या कामाबद्दल थोडक्यात

अतुल यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. ‘अळी मिळी गुपचिळी’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका केली. याशिवाय ‘कापूसकोंड्याची गोष्ट’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘नातीगोती’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘टिळक आणि आगरकर’ या प्रसिद्ध नाटकांमधील अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.