गेल्या वर्षी ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे आता या मालिकेतील कलाकार नवनवीन चित्रपट, मालिकांमध्ये पाहायला मिळत आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अवनी म्हणजेच अभिनेत्री साक्षी गांधी ‘नवी जन्मेन मी…’ या मालिकेत दिसत आहेत. तसेच सरू म्हणजेच अभिनेत्री नंदिता पाटकर नवीन चित्रपट आणि नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तसेच वैभव म्हणजेच अमेय बर्वे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत झळकत आहे. आता अंजली देखील लवकरच ‘स्टार प्रवाह’च्या एका लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळणार आहे.
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत अभिनेत्री कोमल कुंभारने अंजली ही भूमिका उत्तमरित्या साकारली होती. त्यामुळे कोमलला पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते देखील उत्सुक होते. आता कोमल लवकरच ‘अबोली’ या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत अभिनेत्री मनवाच्या भूमिकेत ती पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – व्हॅलेंटाईन डेला साखरपुडा, तर लग्न…; प्रथमेश परबच्या अनोख्या लग्नपत्रिकेने वेधलं लक्ष
‘अबोली’ मालिकेतील मनवा ही नेमकी कोण आहे? याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये होती. अखेर मनवा ही कोमल कुंभार असणार आहे, हे समोर आलं आहे. मनवा ही मालिकेतील खूप महत्त्वाची भूमिका आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मनवाचा अबोली शोध घेत आहे. तिचा शिंदे कुटुंबाशी आणि बहुरुप्याशी काय संबंध आहे? हे सगळं आता मनवाच्या एन्ट्रीमुळे उघडकीस येणार आहे.
दरम्यान, कोमल कुंभारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिची ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही पहिलीच मालिका होती. तिची ही मालिका चांगलीच गाजली. अडीच वर्ष ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. १००० भागांचा टप्पा पूर्ण करून या मालिकेने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला.