‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतून अवनी म्हणून घराघरात पोहोचलेली साक्षी गांधी सध्या ‘नवी जन्मेन मी’मध्ये पाहायला मिळत आहे. या मालिकेत साक्षीने संचिता ही भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. अवनीप्रमाणेच साक्षीच्या संचिता भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. या लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर एका अभिनेत्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे; या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री साक्षी गांधी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी आपल्या कामाबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबतही पोस्ट शेअर करत असते. तसंच तिचे फोटो, व्हिडीओ कायम व्हायरल होतं असतात. नुकतीच साक्षीने अभिनेता रोहन गुजरच्या वाढदिवसानिमित्ताने खास भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – Bigg Boss: सिद्धार्थ शुक्ला, विवियन डिसेना नाही तर ‘या’ स्पर्धकाला दिलेलं मोठं मानधन, फक्त तीन दिवसांचे मिळालेले २.५ कोटी

साक्षीने रोहन गुजरबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “३३ वेळा लिहून, खोडून अखेर ही पोस्ट करत आहे. कारण प्रामाणिकपणे तुझ्याइतकं उत्तम आम्हाला लिहिता येत नाही. रोहन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू जे पात्र साकारतोस आणि जसं तू जगतोस , या दोन्ही गोष्टींचं मला नेहमी कौतुक वाटतं आलंय. इतकं साधं राहणं, साधं जगणं, चिकित्सक वृत्ती नाही, कशाचीही तक्रार नाही, कधी कुणाबद्दल वाईट वक्तव्य नाही. हे आणि यांसारखे असंख्य गुण हे फार दुर्मिळ लोकांकडे असतात आणि त्यातला तू एक आहेस.”

पुढे साक्षी गांधीने लिहिलं, “खरं सांगायचं तर सुरुवातीला खूप दडपण यायचं तुझ्याबरोबर काम करताना. कारण मी लहानपणापासून तुझं काम पाहत आलेय. (याचा अर्थ तू लगेच वयाने मोठा होत नाहीस ) रोहन गुजरबरोबर स्क्रीन शेअर करायची म्हटल्यावर थोडं टेन्शन, अस्वस्थता आणि चिंता होतीच. पण मित्रा तू एक उत्तम सहकलाकार आहेस. तुझं मार्गदर्शन नेहमी पटण्याजोगं आणि योग्य असतं. त्याचा प्रत्यय वेळोवेळी मला आलेला आहे.”

हेही वाचा – Video: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड झाला सावंतवाडीचा जावई, लग्नाचा पूर्ण व्हिडीओ आला समोर; म्हणाला, “प्रपोज नाही थेट लग्नाची घातलेली मागणी…”

“रोहन तुझ्याशी कुठल्याही विषयावर बिनधास्त बोलता येऊ शकतं, तुझ्याबरोबर कुठल्याही समस्या आम्ही शेअर करू शकतो. कारण तू आम्हाला जज न करता उत्तम पर्याय देणार याची खात्री असते. कधीही काहीही महत्वाचं ठरवायचं असेल, तर आधी रोहनशी बोलून बघूया हे आपसूकच सगळ्यांच्या तोंडून येतं. तितका तू आमच्यासाठी महत्त्वाचा आहेस. आपले सीन्स जे चांगले होतात, असे बरेच जण म्हणतात. पण त्याचं क्रेडिट तुझं असतं. कारण तुझी एनर्जी मला पकडता येते. हे वाक्य असं घेऊन बघ. साक्षा जरा न चिडता बोल, ठेव ते स्क्रिप्ट, नको पाठ करू, लक्षात ठेव गं…रोहन तुझ्या या सगळ्या बोलण्याचा मला फक्त आणि फक्त फायदाच झालाय. यासाठी मी तुझी खूप आभारी आहे.”

“तुला माहिती असेलच पण तरीही सांगते, तुझं आणि तुझ्या कामाचं खूप कौतुक होत असतं. साक्षी तुझा तो मित्र रोहन खूप चांगलं काम करतो गं. आपल्या मित्राबद्दलचं हे असं कौतुक, कसलं भारी वाटतं हे ऐकायला. आपल्या सेटवरचे स्पॉट दादा त्यांचं काम जितकं मनापासून करतात, तसंच आपणही आपलं काम मनापासून आणि प्रामाणिक करायचं. आणि माणुसकी सोडायची नाही . आयुष्यभर हे मी लक्षात ठेवेन. ‘गुरू रोहन गुजर’ तर… तू रोज काम करतोयस आणि तुझ्या आवडीचं काम तुला तुला आयुष्यभर करायला मिळतंय एवढीच प्रार्थना बाकी सगळं मी बोलतंच राहीन आणि येस माझी बडबड कमी करेन. थोडी मोठी झाल्यासारखी वागेन. पण एका अटीवर…रोहन आपण ना…चायनिज खाऊ…पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,” असं साक्षी गांधीने लिहिलं आहे.

हेही वाचा – Video: जान्हवी किल्लेकर, घन:श्याम दरवडेचा ‘पुष्पा २’मधील ‘अंगारों’ गाण्यावरील मजेशीर रील पाहिलंत का? नेटकरी म्हणाले…

दरम्यान, साक्षी गांधीने लिहिलेल्या या सुंदर पोस्टचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. तसंच रोहन गुजरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahkutumb sahaparivar fame sakshee gandhi share special post for rohan gujar on his birthday pps