अभिनेत्री सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत आणि मेघा धाडे दीड वर्षांनंतर एकमेकींना भेटल्या आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात झालेली ही मैत्री अजूनही टिकून आहे. तिघी सध्या आपल्या पतीसह कोकणातल्या समुद्र किनारी सुट्ट्या एन्जॉय करत आहेत.
अभिनेत्री मेघा धाडेचा रत्नागिरीतल्या गणेशगुळे इथल्या समुद्र किनारी असलेला नवा व्हिला नुकताच पर्यटकांसाठी खुला झाला आहे. याच व्हिलावर या तिघी मैत्री एन्जॉय करत आहेत. सईने फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सईने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये हे त्रिकुट झोपाळ्यावर मज्जा-मस्ती करताना दिसत आहेत. तसेच अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिघींचे पती देखील या धमाल-मस्तीमध्ये सामील झाल्याचं पाहायला मिळत आहे.
बऱ्याच वर्षांनंतर तिघींना एकत्र पाहून चाहते देखील आनंदी झाले आहेत. ‘बिग बॉसमध्ये तुम्ही माझ्या आवडत्या होता’, ‘हे त्रिकुट पाहून खूप आनंद झाला’, ‘तुमच्यात पुष्कर पण पाहिजे होता’, ‘तुम्हाला पाहिल्यानंतर लगेच बिग बॉसची आठवण आली’, अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर चाहत्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, सई सध्या मातृत्व एन्जॉय करत आहे. तर शर्मिष्ठा आता अभिनयासह निर्मिती क्षेत्रात जबरदस्त काम करत आहे. तसेच मेघा राजकारणात सक्रिय झाली असून नव्या व्यवसायात पदार्पण केलं आहे.