“नो एन्ट्री पुढे धोका आहे”, “किस किस को प्यार करू”, ‘पारंबी’ अशा अनेक चित्रपटांमुळे अभिनेत्री सई लोकूर घराघरांत लोकप्रिय झाली. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्याच पर्वात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आपल्या दमदार खेळाने सईने प्रत्येकाचं मन जिंकलं होतं. पुढे, काही वर्षांनी वैयक्तिक आयुष्यात २०२० मध्ये तिने तीर्थदीप रॉयबरोबर लग्नगाठ बांधली. ३ वर्षांच्या सुखी संसारांनंतर सईने अलीकडेच गोड बाळाला जन्म दिला.
सईने तिच्या लाडक्या लेकीचं नाव ताशी असं ठेवलं आहे. प्रसूतीनंतर आता अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. नुकतंच इन्स्टाग्राम ‘आस्क मी सेशन’ घेत अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणातील काही अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केले. सईच्या एका चाहतीने तिला “प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्याचा (पोस्टपार्टम डिप्रेशन) सामना कसा करावा?” असा प्रश्न विचारला.
चाहतीच्या प्रश्नाला उत्तर देत सई म्हणाली, “मला आतापर्यंत पोस्टपार्टम डिप्रेशनचा अनुभव आलेला नाही. सध्या माझ्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्याचा मी फक्त आनंद घेत आहे. पण, खरं सांगायचं झालं, तर अनेकदा मी संपूर्णपणे थकून जाते. काहीवेळा मला झोप येत नाही, सतत भूक लागते. पाठ दुखते, ब्रेस्ट पेनचा त्रास होतो. या सगळ्यात खूपदा माझा संयम सुटतो आणि मी रडायला लागते. मला खात्री आहे की, प्रत्येक आईला या सगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. आई होणं ही खरोखरच खूप मोठी जबाबदारी असते.”
हेही वाचा : ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये झळकणार ‘ही’ बालकलाकार! याआधी स्टार प्रवाहच्या तब्बल तीन मालिकांमध्ये केलंय काम
“अर्थात या सगळ्या गोष्टी क्षणिक असतात. पण, या व्यतिरिक्त मी खरंच खूप जास्त आनंदी आहे. आता माझी लेक ताशी ही माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहे. हा प्रवास आव्हानात्मक असला तरीही, आई झाल्यापासून मी प्रचंड आनंदी आहे.” असं उत्तर सई लोकूरने चाहतीला दिलं.