Sairaj Kendre : २०२३ मध्ये गणपतीच्या दिवसांत ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. हे मूळ गाणं माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे या दोन भावंडांनी गायलं आहे. परंतु, या गाण्यावरचा बालकलाकार साईराज केंद्रेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. साईराजचे गोंडस व निरागस हावभाव पाहून सगळेच थक्क झाले होते. सोशल मीडियावर सर्वत्र साईराजची चर्चा चालू होती. अशातच ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत एप्रिल महिन्यात साईराजची एन्ट्री झाली.
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत साईराजने ( Sairaj Kendre ) अमोल ऊर्फ सिम्बा हे पात्र साकारलं आहे. मालिकेत प्रेक्षकांना सात वर्षांचा लीप पाहायला मिळाला आणि त्यानंतर साईराजची एन्ट्री झाली होती. त्याचे निरागस हावभाव, दमदार अभिनय यामुळे मालिकेच्या टीआरपीवर देखील सकारात्मक परिणाम झाला. या चिमुकल्याला घराघरांत पसंती मिळाली. पण, मालिकेच्या शूटिंगनिमित्त या लहानग्या सिम्बाला आपल्या आईपासून दूर राहावं लागतं.
नुकताच दिवाळीच्या सुट्टीनिमित्त साईराज ( Sairaj Kendre ) आपल्या मूळ घरी परतला होता. मात्र, आता शूटिंगच्या सेटवर तो पुन्हा एकदा येण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या वडिलांबरोबर घरातून निघताना साईराज आपल्या आईला मिठी मारून हमसून हमसून रडल्याचं पाहायला मिळालं. त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि आईला सोडून राहण्याचा पहिला प्रवास सुरू झाला” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “बाळा तुझं काम खूप छान आहे. तू तुझ्या आई-बाबांचा आणि आम्हा सर्वांचा पण लाडका आहेस”, “साईराज तुला खूप मोठं व्हायचं आहे ना”, “सिम्बा रडताना चांगला नाही दिसत हसत राहा”, “अरे तुला पाहून आम्हाला पण रडू येतंय”, “आई ती आई असते” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. आई आणि लेकाचं प्रेम पाहून प्रत्येकाचं मन भरून आलं आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात साईराजला ( Sairaj Kendre ) सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. त्याच्या अभिनयाचं नेहमीच प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात येतं.