Sairaj Kendre : ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेमुळे बालकलाकार साईराज केंद्रे सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या मालिकेत त्याने अप्पीचा मुलगा ‘सिंबा’ म्हणजेच अमोल ही भूमिका साकारली आहे. यावर्षी मालिकेत प्रेक्षकांना सात वर्षांचा लीप पाहायला मिळाला आणि त्यानंतर साईराजची एन्ट्री झाली होती.
‘अप्पी आमची कलेक्टर’ ही साईराजची पहिलीच मालिका आहे. यापूर्वी तो सोशल मीडियावर ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर केलेल्या गोंडस हावभावांमुळे लोकप्रिय झाला होता. पण, मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करता आली. इतकंच नव्हे तर, यंदा ‘झी मराठी’च्या सर्वोत्कृष्ट बालकलाकार या पुरस्कारावर सुद्धा साईराजने आपलं नाव कोरलं. या सगळ्याबद्दल सिंबाच्या पालकांनी त्याच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
साईराज लहान असल्याने त्याचं अकाऊंट त्याचे पालक हँडल करतात. त्यामुळे २०२४ या वर्षाला निरोप देताना साईराजच्या अकाऊंटवरून कृतज्ञता व्यक्त करणारी एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
साईराज केंद्रेची पोस्ट
२०२४ नमस्कार, मी आपला लाडका साईराज केंद्रे म्हणजेच सिंबा. या सरत्या वर्षाने मला खूप काही दिलं. १८ एप्रिल २०२४ हा दिवस माझ्यासाठी खूप मोठा होता. कारण, म्हणजे माझा वाढदिवस आणि याच दिवशी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मला ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही माझी पहिली मालिका मिळाली. त्याचदिवशी आम्ही पहिलं शूट सिंहगड येथे केलं. तो दिवस आजही आठवतोय. सिंहगडाच्या शेकडो पायऱ्या चढून थकलेला मी जेव्हा शूटिंग लोकेशनला पोहोचलो तेव्हा समोरून आलेली पहिली हाक म्हणजे ये बबड्या…ती पहिली हाक म्हणजे माझ्या अप्पूमाँची… अप्पू माँ म्हणजे माझी सिरीयल मधली माझी आई…ती जरी खरी नसली तरी तीच प्रेम मात्र खऱ्या आईपेक्षा कमी नाहीये. ती माझे खूप लाड करते, मला फिरायला नेते आणि हो चुकलं तर ओरडते सुद्धा अगदी खऱ्या आईप्रमाणे… आणि याच दिवशी मला आणखी एक ओळख मिळाली ती म्हणजे सिंबा (अमोल).
‘झी मराठी’ आणि वज्र प्रोडक्शनच्या रूपात मला एक नवीन कुटुंब मिळालं. या गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलाला ही संधी दिली याबद्दल मी ‘झी मराठी’ आणि ‘वज्र प्रोडक्शन’चा कायम ऋणी राहील… २०२४ मध्ये अनुभवलेले काही आनंदी क्षण मी आज तुमच्याबरोबर शेअर करतोय.
१) १८ एप्रिल २०२४ रोजी मला कलाक्षेत्रामध्ये काम करण्याची पहिली संधी मिळाली.
२) झी मराठी, वज्र प्रोडक्शन आणि ‘अप्पी आमची कलेक्टर’च्या रूपात नवीन कुटुंब मिळालं.
३) रोहित पवार सरांसारखे गुरु मिळाले.
४) ज्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने माझी सगळीकडे ओळख झाली, त्याच गणपती बाप्पासाठी मला माझ्या आवाजातील माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं गाणं गाण्याची संधी मिळाली.
५) झी मराठी २०२४… सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कार मिळाला.
६) ११ डिसेंबर २०२४ …गौरीसारखी छोटीशी बहीण माझ्या आयुष्यात आली आणि आमचं कुटुंब पूर्ण झालं. वर्ष येत राहतील जात राहतील पण आपलं प्रेम, आपली भावना आणि आपली श्रद्धा मात्र तशीच राहिली पाहिजे. माझ्या सर्व चाहत्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.
दरम्यान, साईराजच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “येणाऱ्या वर्षात आणखी प्रगती कर”, “जबरदस्त साईराज”, “साईराजला संधी दिल्याबद्दल वाहिनीचे आभार”, “किती गोड आहे हे बाळ”, “अशीच प्रगती कर बाळा” अशा शुभेच्छा या बालकलाकाराला त्याच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.