सखी गोखले( Sakhi Gokhale) सध्या तिच्या ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकामुळे चर्चेत आहे. त्यामध्ये अभिनेता व तिचा पती सुव्रत जोशीदेखील मुख्य भूमिकेत दिसत आहे. सखी गोखले ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचली. तिची रेश्मा ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. सर्वांची काळजी घेणारी, प्रेमळ, सर्वांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालणारी, छोट्या छोट्या गोष्टींमुळे रडणारी, हळवी अशी ही रेश्मा प्रेक्षकांची लाडकी बनली होती. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. आता अभिनेत्रीने नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत तिच्या आईविषयी म्हणजे अभिनेत्री शुभांगी गोखलेंविषयी वक्तव्य केले आहे.

आईबरोबर भांडायचं धाडस…

सखी गोखलेने नुकतीच ‘व्हायफळ’ या पॉडकास्टला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत सखी तिच्या आईबाबत म्हणजेच शुभांगी गोखले यांच्याबाबत म्हणाली, “बाबा गेले तेव्हा मी खूप लहान होते. त्यानंतर आयुष्य कसं जगायचं, ही तिची निवड होती आणि तिनं आयुष्य आनंदानं परिपूर्ण रीतीनं जगायचं ठरवलं आणि त्यामुळे माझं आयुष्य सुखकर झालं. तिनं कायम माझ्याबरोबर एका पद्धतीची मैत्री ठेवलीय. मी लहान असताना माझी आई खूप कडक शिस्तीची होती. माझ्यात आईबरोबर भांडायचं धाडसच नाहीये. मी कधीच आईबरोबर भांडली नाहीये. मतभेद होऊ शकतात; पण भांडण्याची हिंमत होत नाही. पण, तिनं तिच्या आयुष्यात सुरू असलेल्या गोष्टी, तिच्या कामात, मैत्रींमध्ये जे काही असेल त्यामध्ये खूप पारदर्शकता ठेवली. त्यामुळे कधीच माझ्यापासून काहीतरी लपवायचं आहे, असं कधीच नव्हतं. जे आहे, ते मला माहीत आहे. त्यामुळे दोघींसाठी सोपं होतं.”

“मला असं वाटतं की, ज्यांचे पालक मुलं खूप लहान वयात असताना जातात, दोघांतलं कोणा एकाचं निधन होतं. तेव्हा ती मुलं थोडीशी पटकन मोठी होतात. कारण- तुम्ही तुमच्या पालकांचे जोडीदार असता. ती जागा तुम्ही भरून काढू शकत नाही आणि ती जबाबदारीदेखील तुमच्यावर नसते. माझ्या आईनं माझ्याकडून अशी कधीच कोणती अपेक्षा ठेवली नाही. पण, मला असं वाटतं की, ते मुलांच्या मनात असतं. त्यामुळे ही मुलं त्यांच्या पालकांच्या भावनांचादेखील विचार करतात. त्याची पालकांना मदत होत असते, याची गरज नाही. त्यांना फरकही पडत नसेल; पण मुलं ती उणीव भरून काढत असतात.

मला असं वाटतं की, मी माझ्या आईला मी लहान असल्यापासूनच एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहू लागले. पालकसुद्धा पहिल्यांदाच पालकत्व निभावत आहेत, ते चुकणारच आहे. त्यांनी हे पहिल्यांदाच अनुभवलं आहे. हे कधीतरी आपल्या नंतर लक्षात येतं. त्यामुळे मला मी माझ्या आईला कायमच एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिलं. कारण- तिच्या आयुष्यात ते दु:ख इतक्या लवकर आलं की, मला तिच्याबद्दल वाटणारी भावना अशी होती की, तुला हवं ते सगळं तुला मिळू दे. मी आज्ञाधारक होते. एक पॉइंटनंतर मी खूप बंडखोर नव्हते. मीसुद्धा अशा गोष्टी केल्या आहेत; पण मला असं वाटतं की, तेव्हा तेव्हा माझी आई माझ्या पाठीशी मैत्रीण म्हणून उभी राहिली आहे. माझ्यासाठी ती आणि मी दोघीच होतो. त्यामुळे ती माझ्यासाठी सर्व काही आहे. ती माझ्यासाठी माझी आई, वडीलसुद्धा होती. मला भावंडं नाहीयेत, तर तिनं भावंडांची भूमिकासुद्धा निभावली. आजी-आजोबा गेल्यानंतर तिनं ती मायाही लावली. मला वाटतं की, मला मोठं करणं, हा तिच्यासाठी मोठा टास्क होता. माझ्या बाबतीत तिनं प्रत्येक वेळी धाडसाचा निर्णय घेतला. तिचं आयुष्य माझ्या आयुष्याभोवती फिरतं. तिनं प्रत्येक दु:खाच्या क्षणाचा आनंद निवडला. त्याचं मला भयंकर कौतुक वाटतं. बाबा गेले, आजोबा-आजी, मोठा मामा गेले, त्या सगळ्या दु:खातून, एकटेपणातून आनंद शोधणं खूप ताकदीचं काम आहे.”