Saleel Kulkarni on trollers: अलीकडे सोशल मीडियाच्या काळात नेटकऱ्यांकडून अनेक चांगल्या गोष्टींचं कौतुक होतं. मात्र कौतुकापेक्षा अधिक आता ट्रोलिंगचं प्रमाणही वाढलं आहे. सोशल मिडिया आणि ट्रोलिंग हे जणू काही एक समीकरणच झालं आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकरी स्वत:चं नाव आणि चेहरा लपवून कलाकारांना ट्रोल करत असतात. काही कलाकार या ट्रोलिंगकडे दुर्लक्षच करतात, तर काही या ट्रॉलर्सना चांगलंच धारेवर धरतात. तर काही जण या ट्रोलर्सना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उत्तर देत असतात.
अशातच गायक, संगीतकार आणि कवी सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) यांनी त्यांच्या एका कवितेमधून सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांवर भाष्य केलं आहे. सलील कुलकर्णींनी ट्रोलर्सवर आधारित “नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो” हे शीर्षक असलेली कविता सादर केली आहे. ही कविता सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून चाहते व कलाकारांनी या कवितेला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
सलील कुलकर्णींची कविता
“नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो,
रोज वेगळं नाव लावून, लपून लपून भुंकीन म्हणतो…
याच्यासाठी काही म्हणजे काही लागत नाही,
कोणी इथे तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही
कष्ट नको, ज्ञान नको, विषयाचीही जाण नको,
आपण नक्की कोण, कुठले, याचे सुद्धा भान नको
खूप सारी जळजळ हवी, विचारांची मळमळ हवी,
दिशाहीन त्वेष हवा, विनाकारण द्वेष हवा
चालव बोटे धारदार, शब्दांमधून डंख मार,
घेरून घेरून एखाद्याला वेडा करून टाकीन म्हणतो
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो…
खाटेवरती पडल्या पडल्या चिखल उडव,
ज्याला वाटेल, जसं वाटेल, धरून धरून खुशाल बडव
आपल्यासारखे आहेत खूप, खोटी नावे, फसवे रूप,
जेव्हा कोणी दुबळे दिसेल, अडचणीत कोणी असेल
धावून धावून जाऊ सारे, चावून चावून खाऊ सारे,
जोपर्यंत तुटत नाही, धीर त्याचा सुटत नाही,
सगळे मिळून टोचत राहू, त्याच्या डोळ्यात बोचत राहू,
धाय मोकलून रडेल तो, चक्कर येऊन पडेल तो
तेवढ्यात दुसरे कोणी दिसेल ज्याच्या सोबत कोणी नसेल,
आता त्याचा ताबा घेऊ, त्याच्यावरती राज्य देऊ,
मग घेऊ नवीन नाव, नवा फोटो, नवीन डाव,
त्याच शिव्या, तेच शाप, त्याच शिड्या, तेच साप
वय, मान, आदर, श्रद्धा सगळं खोल गाडीन म्हणतो,
जरा कोणी उडले उंच त्याला खाली पाडीन म्हणतो…
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो…
थोडा डेटा, खूप मजा, छंद किती स्वस्त आहे,
एका वाक्यात खचते कोणी फिलिंग किती मस्त आहे
नवा डेटा पॅक दे ना आभाळावर थुंकीन म्हणतो”
या कवितेसह सलील कुलकर्णींनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “निनावी आणि चेहरे नसलेल्या माणसांचं एक निरीक्षण… कुठून येतात ही माणसं? कुठून येते ही वृत्ती? कोणाविषयीच आदर न वाटणारी… ते एखादंच वाईट वाक्य बोलतात… पण जो ऐकत असतो, त्याने ऐकलेलं त्या दिवसातले १०० वे वाईट वाक्य असेल आणि त्याचा तोल ढळला तर? तो जगण्यावर रुसला तर? अशी यांना भीतीसुद्धा वाटत नाही. या वृत्तीच्या माणसांच्या मनातल्या अंधारात डोकावून पाहायचा प्रयत्न करतांना ही कविता सुचली.”
सलील कुलकर्णींच्या या कवितेला चाहत्यांसह अनेक कलाकारांनी दाद दिली आहे. समीर चौघुले यांनी “सध्याच्या चेहराहीन प्रोफाईल लॉक ट्रोलर्सची योग्य मानसिक अवस्था. अप्रतिम सलील दा..” असं म्हटलं आहे, तर नम्रता संभेरावने “सर कडक चपराक, गरज होती” असं म्हटलं आहे. शिवाय सुनंदन लेले, अश्विनी भावे, आर्या आंबेकर कुशल बद्रिके, सुमित राघवन यांसारख्या अनेकांनी कमेंट्सद्वारे सलील कुलकर्णींच्या कवितेचं कौतुक केलं आहे.