छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. हास्यजत्रेतील हास्यवीर विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. हास्यजत्रेमुळे अभिनेता समीर चौघुलेंच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत चौघुले प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. समीर चौघुले सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच समीर यांनी सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या यूट्यूबवरील पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान समीर यांनी त्यांच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाबद्दल, हास्यजत्रेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेबद्दल आणि रसिकांच्या प्रेमाबद्दल भाष्य केलं. याबरोबरच इतरही बऱ्याच विषयांवर समीर चौघुले यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच मुलाखतीमध्ये आपल्या स्ट्रगलबद्दलही समीर यांनी प्रथमच उघडपणे भाष्य केलं. याबरोबरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमुळे समीर यांच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली.

आणखी वाचा : ‘यदा कदाचित’सारख्या नाटकाचे ३००० प्रयोग करूनही ओळख न मिळण्याबद्दल समीर चौघुलेंनी केलं भाष्य; म्हणाले…

या कार्यक्रमाने समीर यांना एक वेगळाच आनंद दिला. खासकरून कोविड काळात हास्यजत्रेने लोकांना बरंच काही दिलं. त्याबद्दल बोलताना समीर म्हणाले, “तो काळ खरंच खूप कठीण होता, पण आम्हा कलाकारांसाठी तो वरदान ठरला. त्याकाळात हास्यजत्रा घराघरात पोहोचली. कोविड सेंटर्समध्ये त्यावेळी टीव्हीवर हास्यजत्रा दाखवली जायची. हा खूप मोठा अभिप्राय आहे. कोविड काळात हास्यजत्रेमुळे खूप आत्महत्या टळल्या आहेत, आमच्याकडे बऱ्याच लोकांचे मेसेजेस आहेत. आम्हाला माणसांनी येऊन हे भेटून सांगितलं आहे काहींनी तर पत्रंदेखील दिली आहेत.”

पुढे समीर म्हणाले, “हा काळ आमच्यासाठी कठीण होता. आमच्याही घरी लोक आजारी पडत होते. माझे बाबा आणि बायको एकाच वेळी रुग्णालयात आणि मी दमणला कॉमेडी स्किट करत होतो. शूटिंग करून मी परतलो तेव्हा मी स्वतः १० दिवस रुग्णालयात होतो. हे एवढं सगळं होऊनही आम्हाला विनोद करायचा आहे आणि अशा परिस्थितीतही आम्ही सगळ्यांनी काम केलं. हे सगळं आम्ही केवळ प्रेक्षकांचं प्रेम व त्यांचे आशीर्वाद यामुळेच शक्य झालं.”