‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा’ हे नवं पर्व जोरदार सुरू आहे. जुनी गाणी नव्या सुरात आणि वेगळ्या अंदाजात ऐकायला मिळत आहेत. या स्पर्धेत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता समीर परांजपे सहभागी झाला होता. त्याने आपल्या आवाजाने परीक्षकांसह श्रोत्यांची मनं जिंकली. त्यामुळे समीरच्या आवाजाचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला. पण काल समीर या स्पर्धेतून बाहेर झाला. त्याच्याबरोबर श्रृती जय ही देखील या स्पर्धेतून बाहेर पडली. याचनिमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर भलीमोठी भावुक पोस्ट करत सर्वांचे आभार मानले.
अभिनेता समीर परांजपेने ‘सूर नवा ध्यास नवा’मधील आतापर्यंतच्या प्रवासाचे काही फोटो शेअर करत लिहिलं आहे, “आयुष्यात एखादी प्रिय गोष्ट काही कारणांनी करायची राहून गेली की ती राहूनच जाते म्हणतात आणि फक्त दिवसेंदिवस आपल्यातलं आणि त्या गोष्टीतलं अंतर वाढत राहतं. आपण असहाय्य पणे फक्त बघत राहतो हळहळत राहतो…कट्ट्यावर वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीप्रमाणे २-४ मित्रांच्या टोळक्यात आपल्या गुरूने दिलेल्या शिदोरीवर पोसलेल्या कलेची चमक दाखवून वाह वाह मिळवत राहतो आणि अरे लेका तू हे सीरि seriously करायला हवं होतंस नाव काढलं असतंस हे ऐकून उगाचंच खूश होत राहतो. हे सगळं मी ही अनुभवलं आहे. पण अशीच एखादी राहून गेलेली गोष्ट फिरून परत आली तर? त्यावेळी राहून गेलं होतं काही कारणांनी म्हणतोस ना चल आता संधी आहे आता काय कारण देतोस बोल असे नियातीनेच पत्ते पिसले तर?? मी ही तेच केलं.. हावरटा सारखं गाणं जगून घेतलं.”
हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: लग्नानंतर सई मुक्ताला ‘या’ नावाने मारणार हाक, म्हणाली…
पुढे समीरनं लिहिलं, “सूर नवा ध्यास नवाच्या निमित्ताने पुन्हा गाणं करण्याची संधी मला दिलीत यासाठी सर्वप्रथम कलर्स मराठीचे खूप आभार. कलर्स मराठीची सगळी टीम तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे मी गाऊ शकलो. एकविरा प्रोडक्शनची सगळी टीम तुमचे ही खूप आभार फार मजा आली. आमचे mentors @sampadaa_bandodkar @chintamanisohoni तुमचे विशेष आभार..सीन बसवण्याची सवय असलेल्या मला गाणं कसं बसवायचं हे तुम्ही शिकवलंत.”
“आमचे सगळे म्युझिशिअन आणि त्यांचे कॅप्टन @mithileshpatankar दादा तुम्ही वेळोवेळी केलेल्या सूचना आणि तू मस्त गा ऐनवेळी काही झालंच तर “कॅच” पकडायला आहोत तुम्ही या दिलेल्या विश्वासामुळे मी बिनधास्तपणे गाऊ शकलो. @ajitparab75 दादा तुमच्याकडून काव्य/ कविता/ गाणं कसं वाचावं हे शिकायला मिळालं. चाल बसली आहे आता “शब्द गा” ही तुम्ही केलेली सूचना कायम लक्षात राहील आणि कायम मी तो प्रयत्न करेन,” असं समीर म्हणाला.
पुढे अभिनेत्री रसिका सुनीलविषयी अभिनेत्याने लिहिलं, “रसिका सुनील तूही सूर नवा चा प्रवास माझ्यासारखाच “जगतीयेस”. बोल्ड बिनधास्त ब्युटीफुल आणि उत्तम अभिनेत्री मागची हळवी कलाकार मला कळली आणि खूप भावली. आपली मैत्री इथून सुरू झाली आहे ती अशीच राहील याची खात्री आहे. माझ्या सगळ्या स्पर्धक मित्रांनो तुमच्याकडून ही खूप गोष्टी शिकलो. तुम्ही सगळे कमाल आहात. गाते रहो…”
हेही वाचा – राज हंचनाळेच्या ‘या’ सवयीमुळे त्याची बायको तेजश्री प्रधानला करते फोन, किस्सा सांगत म्हणाली…
या पोस्टनंतर समीरने आणखी एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्याने परीक्षकांसह प्रेक्षकांचे आभार मानले. या पोस्टमध्ये समीरनं लिहिलं, “सूर नवाचे आमचे लाडके परीक्षक अवधूत गुप्ते काय बोलू मी दादा..नारायणा नंतरची मिठी कायम लक्षात राहील..तुमची शिट्टी आणि पार बुक्का पाडलास मित्रा हे ऐकलं की काय आनंद होतो सांगू..महाराष्ट्राचा रॉकस्टार गायक संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून आमचं मन तुम्ही जिंकल आहेच.. परीक्षक म्हणून ही तुम्ही आम्हा सगळ्यांचे लाडके आहात पण इथे शूटींग सुरू होण्याआधी ज्या आत्मीयतेने तुम्ही सगळ्या स्पर्धकांची चौकशी करायचात, तब्येत वगैरे ठीक आहे ना विचारायचात, बाहेरगावाहून आलेल्या आणि स्पर्धेसाठी इकडे मुंबईत राहत असलेल्या स्पर्धकांना राहता तिथे काही अडचण नाही ना, सगळं नीट वेळच्या वेळी मिळतंय ना काहीही अडचण असेल तरी डायरेक्ट मला सांगा म्हणायचात…तेव्हा मला कळलं कुठल्याही गाण्यातला भाव तुम्ही इतक्या ताकदीने पेश कसं करू शकता.. तुमचं “माणूसपण” तुमच्या प्रत्येक गाण्यात उतरतं बहुदा…परीक्षक म्हणून तुम्ही दिलेल्या कमेंट्समधून तर शिकलोच पण माणूस म्हणून ही खूप काही शिकवलंत..खूप प्रेम..आणि माझा वनवास संपवलात यासाठी कायम ऋणात राहीन.”
“महेश काळे, दादा गाण्यानंतरच्या तुमच्या सूचना कमेंट्स या लाख मोलाच्या असतातच. त्याचे आम्ही स्पर्धकच नाही तर प्रेक्षक ही फॅन आहेत. पण कला ही साधना आहे आणि साधनेची शुचिर्भूतता कशी राखावी कलेशी एकनिष्ठ कसं राहावं, मेहनतीतून काय साधायचं आणि काय भेदायचं शिकवलंत.. तुम्ही गाता तेव्हा अभिनेता गातोय असं वाटत नाही गाण्यावर जरूर मेहनत घ्या रियाजाची शिदोरी वाढवा मी तुम्हाला मदत करेन हे तुम्ही म्हणालात हे मला कायम आठवण करून देत राहील की मला गाणं करायचं आहे मेहनत घ्यायची आहे. तुमचे ही खूप आभार”
“आणि सगळ्यात शेवटी रसिकप्रेक्षक, खरंतर मनात खूप भीती होती प्रेक्षक गायक म्हणून स्वीकारतील का? अरे हा अभिनेता आहे याला उगाच आणलंय स्पर्धेत असं तर म्हणणार नाहीत ना…पण तुम्ही प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रेम, शुभेच्छा दिल्या…माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना दाद दिलीत आणि गायक म्हणूनही मला स्वीकारलं त्यासाठी तुमचे ही आभार…असंच प्रेम आणि आशीर्वाद देत राहा,” असं समीरनं लिहिलं आहे.
दरम्यान, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेतील समीरने साकारलेला अभिमन्यु प्रेक्षकांच्या चांगलांच पसंतीस पडला होता. तसेच याआधी ‘गोठ’ मालिकेत त्याने साकारलेली विलास ही भूमिका देखील गाजली होती.