Samir Choughule : बालपण हे प्रत्येकासाठी कायमच खास असतं. बालपणीचे प्रत्येकाचे लक्षात राहण्यासारखे अनेक किस्से, आठवणी असतात. जे आठवून मोठेपणी खूप हसू येतं. असाच एक अनोखा किस्सा आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले यांचा. बालपणी ते हरवल्याने पोलिसांत तक्रार झाली होती आणि गोंधळ झाला होता; पण तेव्हा समीर घरातच होते. हा किस्सा त्यांनी स्वत: नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला आहे.

समीर चौघुलेंचा हरवल्याचा किस्सा

समीर चौघुले यांनी बोलभिडूमध्ये त्यांच्या या बालपणीच्या किस्स्याची आठवण सांगितली आहे. यावेळी त्यांच्याबरोबर सहकलाकार ईशा डे हीदेखील होती. यावेळी समीर यांनी हा किस्सा सांगताना असं म्हटलं की, “लहानपणी मी हरवलो होतो. तेव्हा मी पाच-सहा वर्षांचा असेन. हरवल्यामुळे पोलीस तक्रार झाली होती आणि पोलीस आमच्या घरी आले होते. मी खरंतर घरातच होतो. घरात एक कपाट होतं, त्याच्या आत मी होतो आणि एका कंदीलाशी खेळत होतो कंदीलाची वात खाली-वर करत होतो. कपाटाचं दार बंद झालं होतं.”

“हरवलो समजून आजी रडायला लागली”

पुढे त्यांनी सांगितलं की, “आई कोर्टात कामाला होती. बाबा दादरला होते. घरी आजी मला सांभाळायला होती. त्यावेळी रमन-राघव नावाचा एक सिरियल किलर फिरायचा. तेव्हा त्याची एक दहशत होती. तो मुंगी-कुत्र्याच्या रूपात येतो अशा अफवा असायच्या. त्यामुळे तेव्हा सगळे मुंग्या-डोंगळ्यांना मारायचे; इतकं तेव्हा ते होतं. तर कोणी तरी सांगितलं की, समीरसारखा एक जण बोरिवलीकडे जाताना दिसलं. तर माझी आजी रडायला लागली.”

“पोलिसांनी बघितलं तर घरीच सापडलो”

पुढे त्यांनी असं सांगितलं की, “हे सगळं माहिती झाल्यानंतर आत्याही पलीकडून रडत आली. समीर हरवला… समीर हरवला… मग पोलीस तक्रार झाली आणि पोलीस घरी आले. घरी येऊन त्यांनी बघितलं की, हा कार्टा घरातच बसला आहे आणि मग तेव्हा सगळ्यांनी इतकं झापलं की… त्यांनी अचानक दार उघडलं तर कपाटाच्या मागेच मी त्यांना दिसलो.” दरम्यान, समीर चौघुले सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

समीर चौघुलेंच्या ‘गुलकंद’ या चित्रपटाबद्दल…

समीर चौघुले यांचा ‘गुलकंद’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात समीर चौघुलेसह सई ताम्हणकर, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, आणि तेजस राऊत आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केलं असून येत्या १ मे रोजी ‘गुलकंद’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.