“प्रेम म्हणजे काय? किंवा लग्न म्हणजे काय?” या केवळ तीन शब्दांच्या विषयावर आपल्या नाट्य आणि सिनेसृष्टीत अनेकांनी आपली संपूर्ण कारकीर्द निभावून नेलेली आहे. त्यामुळे एखाद्या नवीन नाटकासाठी किंवा एकपात्री कार्यक्रमासाठी हा विषय तसा घिसापिटाच! तरीही, मराठीतील आजचा आघाडीचा अभिनेता समीर चौघुले जेव्हा ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या” नावाचा, सामान्य मध्यमवर्गीय माणसाचं प्रेम ते लग्न, या प्रवासावर भाष्य करणारा एकपात्री कार्यक्रम घेऊन येतो तेव्हा तो केवळ दखलपात्रच नव्हे तर शिफारसपात्र देखील होतो ह्याला कारण, समीर चौघुले या नावाशी अभिन्नपणे जोडली गेलेली दर्जेदार, निर्विष विनोदाची हमी!
‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या” हा सबकुछ समीर चौघुले असलेला एकपात्री अभिवाचनाचा प्रयोग आहे. या प्रयोगाची जातकुळी पुलंच्या ‘वाऱ्यावरील वरात”ची आहे. यात नेपथ्य आणि प्रकाशयोजनेचा भपका नाही, संगीताचा दणदणाट नाही की बटबटीत अभिनयाचं प्रदर्शन नाही. पु.ल, चार्ली चाप्लिन, रोवेन अटकींसन या समीरच्या फेव्हरिट कलाकारांचा वारसा पुढे नेणारी ही किस्से आणि निखळ विनोदाची हास्य-मैफिल आहे.
सोनी मराठी चॅनेलवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा” या कार्यक्रमामुळे एक लेखक म्हणून, अभिनेता म्हणून आणि गायक म्हणून समीरचं कॅलिबर अवघ्या मराठी विश्वाला ठाऊक झालंय. या आपल्या लाडक्या अभिनेत्याला याचि देही याची डोळा परफॉर्म करताना पाहायला मोठ्या अपेक्षा घेऊन प्रेक्षक येतात आणि समीरही त्यांच्या अपेक्षांना ‘उम्मीद से दुगना’ खरा उतरतो. “हास्यजत्रेत” इतर अनेक तुल्यबळ अभिनेत्यांसोबत पंधरा-वीस मिनिटांचं स्किट सादर करणारा हा कलाकार ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या” नावाचं हे शिवधनुष्य जवळपास अडीच तास एकट्याच्या खांद्यावर लीलया पेलतो. महत्वाचं म्हणजे, अंगविक्षेप, द्विअर्थी संवाद, राजकीय विधानं किंवा कमरेखालचा विनोद न करताही प्रेक्षकाला हसवता येतं, त्यांचं मनोरंजन करता येतं ही बाब समीरचा हा प्रयोग सप्रमाण सिद्ध करतो.

समीरचा कायिक-वाचिक अभिनय, त्याला असलेलं गाण्याचं अंग, त्याचा कॉमेडी सेन्स, त्याचे विनोदाचे टायमिंग, रोजच्या जगण्यातील विसंगती टिपण्याची, छोट्या-छोट्या किस्स्यांतून विनोद निर्मिती करण्याची आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याची कला यामुळे तो एक ऑल-राऊंडर परफॉर्मर असल्याची खात्री पटते व त्यामुळेच प्रयोग सुरु झाल्यापासून संपेपर्यंत हशा, टाळ्या आणि जल्लोष याचा अक्षरशः माहोल बनलेला असतो. (प्रयोग संपल्यावर, समीरसोबत फोटो घेण्यासाठी शिस्तीत लागलेली भलीमोठी रांग त्याच्या लोकप्रियतेची साक्ष देते.)
पुलंचा विनोद ही जर तुमच्या मर्मबंधातली ठेव असेल, चार्ली चॅप्लिनच्या निर्विष विनोदांनी तुम्ही आजही खळखळून हसत असाल अन मिस्टर बिनच्या भाबडेपणामुळे तुम्हाला आतल्या आत आनंदाची उकळी फुटत असेल तर ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या” हा शो अनुभवण्याची संधी सोडू नका! यात गुंतवलेले दोन तास तुमचा हॅप्पीनेस इंडेक्स दोनशे पट वाढवतील. ये मेरी गॅरेंटी है!