Marathi Actress Samruddhi Kelkar : नवीन वर्षात अनेक मराठी कलाकार चाहत्यांना गुडन्यूज देत आहेत. काही कलाकारांनी नवीन गाड्या खरेदी केल्या, काहीजण नव्या घरात शिफ्ट झाले तर, अनेकांनी लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. या नव्या वर्षात बहुतांश कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांबरोबर या आनंदाच्या बातम्या शेअर केल्या. आता सध्या आणखी एका अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत आली आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून अभिनेत्री समृद्धी केळकर ( Samruddhi Kelkar ) घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने साकारलेली ‘किर्ती’ची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याशिवाय ‘ढोलकीच्या तालावर’ या शोमध्ये तसेच ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत सुद्धा समृद्धीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने समृद्धी रसिक प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. आता अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
समृद्धी केळकरची पोस्ट चर्चेत
समृद्धी केळकरने इन्स्टाग्राम पोस्टवर एक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून सध्या तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरून समृद्धीने खास फोटो शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने “कळवते लवकरच…” असं म्हटलं आहे. या फोटोत अभिनेत्रीच्या हातावर मेहंदी देखील पाहायला मिळत आहे. आता समृद्धी लवकरच नेमकं काय कळवणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
समृद्धीच्या ( Samruddhi Kelkar ) पोस्टवर मराठी कलाकारांनी सुद्धा कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता अक्षय केळकरने, “फायनली…वाट बघतोय” अशी कमेंट केली आहे. तर, काही नेटकऱ्यांनी “हे नक्की काय आहे” असा प्रश्न तिला कमेंट्समध्ये विचारला आहे. आता समृद्धीने हिरवा चुडा भरून नेमकी कशाची हिंट दिलीये हे याचा उलगडा अभिनेत्री लवकरच करणार आहे.
दरम्यान, छोट्या पडद्यावरींल मालिकांशिवाय समृद्धीने (Samruddhi Kelkar ) ‘दोन कटींग’ या शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केलेलं आहे. ती सर्वात आधी २०१७ मध्ये रिॲलिटी शो ‘ढोलकीच्या तालावर’मध्ये झळकली होती. ती उत्तम नृत्यांगणा आहे. या शोच्या महाअंतिम फेरीपर्यंत समृद्धी पोहोचली होती.