Mahira Sharma Mohammed Siraj: छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 13’ फेम माहिरा शर्मा सध्या खूप चर्चेत आहे. माहिरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनाशी संबंधित गोष्टी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर असते. आता ती तिच्या कामामुळे नाही, तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. माहिरा भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिराज आणि माहिरा इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत आहेत आणि सिराजने नोव्हेंबरमध्ये सोशल मीडियावर माहिराची एक पोस्ट देखील लाईक केली होती. त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. माहिरा आणि सिराज सध्या एकमेकांना डेट करत आहेत, या चर्चांवर आता माहिराच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

माहिरा शर्माच्या आईने दिली प्रतिक्रिया

माहिराची आई सानिया शर्माला माहिरा व क्रिकेटपटू मोहम्मद सिराज यांच्यातील नात्याबद्दल विचारण्यात आलं. ती टाईम्स नाऊशी बोलताना म्हणाली, “हे काय बोलताय तुम्ही? असं काहीही नाही. लोक तर काहीही बोलतात. आता माझी मुलगी सेलिब्रिटी आहे, त्यामुळे लोक तोंड उघडून तिचे नाव कोणाशीही जोडतील, मग आम्ही त्या गोष्टी खऱ्या समजायच्या का? ही बातमी पूर्णपणे खोटी आहे.”

माहिरा पारस छाबराबरोबर होती रिलेशनशिपमध्ये

माहिरा शर्मा याआधी पारस छाबराला डेट करत होती. दोघेही ‘बिग बॉस 13’ मध्ये एकत्र दिसले आणि तिथूनच त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. शोमधून बाहेर आल्यानंतर दोघांनी एकमेकांना चार वर्षे डेट केले आणि यादरम्यान ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहिले, पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. स्वतः पारसने त्याच्या शोमध्ये याचा खुलासा केला होता. काही काळानंतर त्यांना वाटलं की ते एकमेकांसाठी योग्य जोडीदार नाहीत, त्यामुळे त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला.

सिराज व जनाई भोसलेच्या अफेअरच्या चर्चा

काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू सिराजचे नाव दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात जानाई भोसले हिच्याबरोबर जोडले गेले होते. दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, नंतर जनाईने पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि सिराज तिचा भाऊ असल्याचं सांगितलं. तर सिराजनेही जनाईची पोस्ट रिपोस्ट करून रिलेशनशिपच्या अफवा फेटाळून लावल्या.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania sharma reacts on daughter mahira sharma mohammed siraj dating rumors hrc