मराठी कलाविश्वात अभिनेता, कवी, लेखक आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय असलेला कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karahade). आपल्या कलागुणांमुळे अल्पावधीतच तो घराघरांत प्रसिद्ध झाला. नाटक, मालिका आणि टेलिव्हिजन शो अशा विविध माध्यमातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. मनोरंजनाच्या तीनही माध्यमांमध्ये मुशाफिरी करणारा संकर्षण सोशल मीडियावरही नेहमीच सक्रीय असतो.
संकर्षण त्याच्या सोशल मीडियाद्वारे स्वत:चे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. तसंच त्याच्या कामानिमित्तची माहितीही शेअर करत असतो. अनेकदा तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना किंवा काही खास प्रसंग चाहत्यांबरोबर शेअर करतो. लेखक व कवी असल्यामुळे त्याच्या पोस्टचे कॅप्शन्सही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. अशातच त्याने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
संकर्षणने सोशल मीडियावर त्याच्या बाबांबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “आमचे बाबा परवा मुंबईहून तडकाफडकी परभणीला निघाले. कारण काय? तर शेतातल्या गड्याचा फोन आला की, आपल्या शेतातला बैल ‘रामा दोन दिवस झाले जागचा उठत नाहीये. काही खात नाहीये. यावर मी बाबांना म्हणलं, बाबा गडी आहे की, तुम्ही जायची काय गरज?”.
पुढे संकर्षणने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “यावर बाबा मला म्हणाले की, उद्या तुला बरं वाटलं नाही तर असाच परभणीहून पळत येईन ना. मी म्हणलं “मी काय बैलासारखाच का? यावर बाबा म्हणाले नाही पण ‘बैल पोरासारखा सांभाळावा. निघाले ते निेघालेच… २ दिवस त्याच्याबरोबर वेळ घालवला, त्याला खूप माया केली आणि त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घातलं.”
यानंतर त्याने पोस्टमध्ये बाबांविषयी असं म्हटलं की, “देवाचा धावा करुन त्या बैलाला तीर्थ म्हणून पाणी पाजलं आणि आता रामा कामाला लागला. आता याला तुम्ही काय म्हणाल? म्हणा काही… पण सगळ्या आघाड्यांवर सतत कसं १०० टक्के खरं उतरायचं हे बाप माणसांना बरोबर कळतं.” संकर्षणची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
संकर्षणने शेअर केलेल्या या पोस्टखाली कमेंट्समध्ये अनेकांनी “किती गोड”, “असे बाबा सगळ्यांना मिळो”, “हे खूपच भारी आहे”, “केवढी ती माणुसकी” अशा अनेक कमेंट्सद्वारे संकर्षणच्या बाबांचे कौतुक केलं आहे. तसंच त्यांचा साधेपणा भावला असल्याचेही अनेकांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वीच संकर्षणचं ‘कुटुंब कीर्रतन’ हे नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या नाटकात अभिनेत्री स्वत: संकर्षण, अभिनेत्री तन्वी मुंडले आणि वंदना गुप्ते यांच्या मुख्य भूमिका आहेत. रंगभूमीवर या नाटकाला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.