देशभरात नुकताच रामनवमीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला. रामनवमीनिमित्त शिर्डीतही मोठा उत्सव पाहायला मिळतो. रामनवमी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने राज्यभरातून अनेक पालख्या शिर्डीत दाखल होत असतात. त्याचबरोबर अनेक साईभक्तही रामनवमीनिमित्त शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतात. असाच एका मराठी अभिनेत्याचा रामनवमीनिमित्त शिर्डीला जाण्याचा योग आला होता आणि हा अभिनेता म्हणजे सौरभ चौघुले (Saorabh Chaughule). ‘जीव माझा गुंतला’ या लोकप्रिय मालिकेतून सौरभ चौघुले घराघरांत पोहोचला.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा सौरभ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियाद्वारे आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने त्याच्या शिर्डीमधील साईबाबांच्या दर्शनाचा खास अनुभव शेअर केला आहे. सौरभ रामनवमीनिमित्त शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी गेला होता आणि या दर्शनादरम्यान आलेला अनुभव त्याने सोशल मीडियाद्वारे एका व्हिडीओमार्फत शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्याने त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये सौरभने असं म्हटलं आहे की, “श्रद्धा आणि सुबरी एक विलक्षण समीकरण आहे. आयुष्यात सेटल होण्याआधी दर महिन्याला शिर्डीची वारी व्हायची. पण गेल्या सात-आठ वर्षांत बोलावणं आलंच नाही. योग आलाच नाही. माहीत नाही का? प्रत्येकवेळी बाबांना साकडं घालायचो की, बोलावणं येउद्या… बोलावणं येऊद्या… शेवटी त्यांनी बोलावलंच आणि ते ही रामनवमीला. तीन दिवस भरभरून प्रेम दिलं. भरभरून दर्शन दिलं. बाबांच्या पालखीपासून बाबांच्या रथापर्यंत सगळं काही पाहायला मिळालं. इतकी वर्षे त्यांची फक्त झलक बघायला मिळावी म्हणून धडपड करायचो. आज त्यांच्या मंदिरात. त्यांच्या अंगणात उनाड मुलासारखं फिरत होतो.”
यापुढे त्याने म्हटलं आहे की, “प्रत्येक कोपऱ्यात जाऊन बसत होतो. समाधी ते द्वारकामध्ये तासनतास भटकत होतो. इतक्यातच बाबा थांबले नाहीत. तर वादनाचाही योग आला. तेही द्वारकामाई आणि चावडीसमोर. बाबा आणि त्यांचे चमत्कारिक खेळ काय कमी असतात. पालखीत निशाण नाचवण्याचीही संधी दिली. ते वादन, ते निशाण, ते भजन ती सेवा करायला मिळणं. बाबांनी सगळी उणीव भरून काढली. सात-आठ वर्षे हरवलेली शिर्डी त्यांनी भरून काढली. निघताना बाबांना एकच बोललो. असेच कायम बोलवत राहा आणि कायम सोबत राहा.”
याशिवाय सौरभने या व्हिडीओच्या खाली कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “मी तिथे अभिनेता किंवा सेलिब्रिटी म्हणून नव्हतो आणि मी तिथे आहे हे कोणालाच माहित नव्हतं. माझे जवळचे साई सेवेकरी ज्यांच्यामुळे मला राम नवमी जगता आली त्यांनाच माहीत होतं. मी तिथे एक भक्त आणि एक सेवेकरी म्हणून होतो. हे सगळं घडवून आणायला मला भेटलेल्या सर्व बाबांच्या अवतारांना माझे खूप खूप आभार.” दरम्यान, सौरभने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कामेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.