छोट्या पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे सौरभ चौघुले (Saorabh Choughule). या मालिकेत सौरभ मुख्य भूमिकेत होता. त्याने साकारलेलं मल्हार हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं होतं. या मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा सौरभ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियाद्वारे आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. तसंच आपल्या कामाबद्दलची माहितीही देत असतो.
सौरभ अनेकदा सोशल आणि समाजिक विषयांवरही भाष्य करताना दिसतो. अशातच त्याने सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर एक कविता शेअर केली आहे आणि ही कविता सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही या कवितेचं कौतुक केलं आहे. ही कविता स्वत: सौरभने लिहिली आहे. “आणि कसलं काय” असं या कवितेचं शीर्षक आहे. तर ही कविता शेअर करत त्याने “खूप दिवसांपासून बरच काही लिहिलेलं असंच मोबाईल मध्ये होतं. विचार केला प्रयत्न करून बघूया जमतय का? कोणाला आवडतंय का?” असं म्हटलं आहे.
सौरभची ही स्वरचित कविता अशी आहे की,
“कसला राग, कसला माज, कसले पैसे, कसले रूसवे-फुगवे आणि कसली जात-पात, सगळं काही क्षणिक…
मेल्यावर जळून राखेत आणि आगीतून चिमणीतल्या पत्र्याला आतून काजळी लावत हवेत उडणारा काळा धूर…
ज्यात तुमच्या आधी जळून गेलेल्यांची काजळी तुम्हाला तुमची जात विचारून नाही चिकटणार, काही राहत नाही…
तुम्ही एक काजळी असता, एक अशी काजळी, जिला मेल्यावर किंमत असते.
आगीचे लोळ फक्त लाकडं जाळतात. शरीर तर चार लाकडांतच जळून जातं. त्यानंतर उरतं फक्त लाकडांचा केलेला व्यवहार…”
पुढे त्याने म्हटलं आहे की,
“कसलं काय? कसली शांती? कसली नाती? आणि कसलं काय? आणि त्या खाली पडलेल्या राखेत काय शोधता तुम्ही?
तुमच्या माणसांची अस्थी? तुमच्या आधी जळून गेलेल्याचं काय? नेमकं काय आहे तुमच्या कळसात?
तुमचंच की दुसऱ्यांचं? काही राहत नाही. तुम्ही एक राख असता. एक खाली पडलेली राख
आणि हा शेवटचं तुमच्या वाटेला आलेली लाकडं ती ही दुसऱ्याच्या वाटेला जातात…
काय तुझं? काय माझं? काय तुमचं? आणि कसलं काय?…”
“खूप छान”, “खूप सुंदर”, “तुला पुन्हा पुन्हा ऐकायला नक्की आवडेल”, “सत्य छान शब्दांत मांडलं आहेस”, “कटू सत्याला योग्य शब्दांत व्यक्त केलंस” अशा प्रतिक्रियांद्वारे चाहत्यांनी सौरभच्या कवितेला दाद दिली आहे. तसंच त्याचं कौतुक केलं आहे. दरम्यान, ‘जीव माझा गुंतला’ मालिकेनंतर सौरभ सन मराठीवरील सुंदरी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शिवाय तो आणि योगिता एका गाण्यातही झळकले होते.