सैफ अली खानची लाडकी लेक साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. गेल्या काही वर्षांत बॉलीवूडमध्ये तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच सारा ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटांत झळकणार आहे. यामध्ये तिच्यासह मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते सचिन खेडेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी नुकतीच साराने ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला.
सारा अली खान ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला सोनेरी काठ असलेली काळ्या रंगाची सुंदर साडी, मोठे कानातले असा हटके लूक करून या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी “मला झी गौरवला आमंत्रित केल्याबद्दल माझ्या मराठी प्रेक्षकांचे खूप खूप आभार! मी आज माझ्या तीन-चार आणि दोन मराठी गाण्यांवर खास परफॉर्म करणार आहे. तुम्ही माझा डान्स नक्की एन्जॉय कराल.” असं साराने लोकमत फिल्मीशी संवाद साधताना सांगितलं.
हेही वाचा : राखी सावंत बुरख्याखाली बिकिनी घालून…; फराह खानने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “तिच्याबरोबर काम करणं…”
सारा अली खानला तुझं आवडतं गाणं कोणतं? याबद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “माझ्या खऱ्या आयुष्यात सध्या माझा दाजिबा नसला तरीही मला ‘ऐका दाजिबा’ या गाण्यावर डान्स करायला खूप आवडेल.” याशिवाय “जेवलीस का?” या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्रीने मराठीत “होय मी खूप जेवली” असं दिलं. तसेच आवडत्या मराठी पदार्थाबद्दल विचारताच साराने ‘पोहे’ उत्तर दिलं.
दरम्यान, सारा अली खानने प्रत्येक प्रश्नांची उत्तरं अगदी दिलखुलासपणे दिली. आता लवकरच अभिनेत्री ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे. हा चित्रपट उषा मेहता यांचा बायोपिक असून यामध्ये सारा अली खान त्यांची भूमिका साकारणार आहे. येत्या २१ मार्चला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.