छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे निधन झाले आहे. ती ३९ वर्षांची होती. हिमाचल प्रदेशात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला. तिच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. वैभवीच्या निधनानंतर तिच्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

वैभवी उपाध्याय ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायची. ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायची. याद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहत होती. वैभवी तिच्या होणाऱ्या पतीबरोबर हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी गेली होती. याची एक पोस्ट तिने शेअर केली होती.
आणखी वाचा : Vaibhavi Upadhyaya Died : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू, सिनेविश्वावर शोककळा

वैभवीने १६ दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने हिमाचल प्रदेशातील काही निसर्गरम्य दृश्य दाखवली होती. यात ती पर्वत, धबधबे, मंदिरे आणि रस्त्यांचे दृश्य दाखवताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने लांबलचक कॅप्शन दिले होते. यात ती म्हणाली, “मी हा जो व्हिडीओ शेअर करत आहे, तो २०१९ चा आहे. याला कॅप्शन देताना तिने हिमाचल प्रदेशातील काही दृश्य दाखवली आहेत.”

“मी जेव्हा लहान होते, तेव्हा मला निसर्गातील विविध आवाज ऐकायला आवडायचे. मी शहरात वाढलेली असल्याने मी निसर्गातील आवाजाबद्दल वंचित होते. माझी आई मुळची गावची असल्याने आम्ही शाळेच्या सुट्टीवेळी आम्ही तिथे जायचो. त्यावेळी मला या आवाजाबद्दल कुतहूल नव्हते. पण जसजशी मी मोठी झाले, तसतसं मला याबद्दल समजू लागले. माझ्या मनात याबद्दल उत्कंठा वाढत गेली.

त्यानंतर योगायोगाने आज इन्स्टाग्राम स्क्रोल करत असताना २०१९ चा एक रिल मला दिसला. त्यात हिमालयातील पर्वत रांगा आणि निसर्गरम्य दृश्य अनुभवल्याचा व्हिडीओ पाहायला मिळाला. यामुळे माझ्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या”, अशा आशयाची पोस्ट वैभवीने केली आहे.

दरम्यान वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात सोमवारी (२२ मे) हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी झाला. हा अपघात इतका भीषण होता की वैभवीचा जागीच मृत्यू झाला. वैभवी ही तिच्या होणाऱ्या पतीबरोबर फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी एका वळणावर त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघातानंतर त्यांची कार थेट दरीत कोसळली.

आणखी वाचा : “नवा सोबती…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेने लग्नाचा पहिला फोटो केला शेअर

वैभवीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘सीआयडी’, ‘अदालत’ आणि ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या तिच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. यातही ‘साराभाई’ या मालिकेतील जास्मीन या पात्राने तिला विशेष ओळख मिळवून दिली. वैभवीने २०२० मध्ये ‘छपाक’ या चित्रपटातही काम केले होते. यावेळी ती प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणबरोबर झळकली होती. त्याबरोबरच तिने ‘तिमिर’ (२०२३) या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गुजराती कलाविश्वात तिचं मोठं नाव होतं. वैभवीने ‘क्या कसूर है अमला का’ आणि ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ या डिजीटल सीरिजमध्येही काम केले.

Story img Loader