‘साराभाई व्हर्सेस सारा’भाई या एकेकाळच्या सुपरहिट टेलिव्हिजन कॉमेडी शोमध्ये रोसेश साराभाईच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळवणारा अभिनेता म्हणजे राजेश कुमार होय. अनेक वर्षे अभिनय केल्यानंतर राजेशने इंडस्ट्रीतून ब्रेक घेत शेती करण्याचा निर्णय घेतला. मी शो बिझनेसला कंटाळलो होतो आणि मिळत असलेल्या कामाबद्दल मी समाधानी नव्हतो, असं राजेशने सांगितलं. पण इंडस्ट्री सोडून शेती करण्याचा त्याचा निर्णय फसला. त्याच्या जवळची बचत संपली आणि तो दिवाळखोर झाला. एका मुलाखतीत त्याने याबद्दल खुलासा केला आहे.
‘राजश्री अनप्लग्ड’ यूट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत राजेशने सांगितलं की त्याने २०१७ मध्ये अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. तसेच वडिलांना सांगितलं की मला तुमच्या वडिलोपार्जित शेतीत काम करायचं आहे. त्याच्या वडिलांना वाटलं की हा काही दिवसांसाठी म्हणत असावा, पण राजेश ठाम होता. त्याने शेती करायला सुरुवात केली, पण त्यात त्याचं मोठं नुकसान झालं आणि तो कर्जबाजारी झाला.
राजेश म्हणाला, “मला वाटलं की एक अभिनेता म्हणून माझी वाढ होत नाहीये, त्यामुळे मी गावी जाण्याचा निर्णय घेतला. पण शेतीच्या जगात मी एक असा चित्रकार होतो, ज्याचा कॅनव्हास कोरा होता. अशा रितीने माझी सुरुवात झाली. मी पाच वर्षे शेतीत खूप काम केले, मेहनत घेतली पण तरीही नुकसान झालं. निसर्ग माझ्याबरोबर खेळत होता. मी २० एकर जमिनीवर १५ हजार झाडे लावली आणि ती पुरामुळे वाहून गेली. यात चार वर्षे गेली आणि मग करोना महामारी आली. आर्थिक संकट येऊ लागलं होतं. त्या काळात मी माझ्या बचतीचे पैसे वापरले पण मी अक्षरशः दिवाळखोर झालो होतो. माझ्या खिशात पैसे नव्हते. माझ्यावर खूप मोठं कर्ज होतं आणि त्यामुळे दबाव वाढत होता.”
या कठीण काळातून एक महत्त्वाचा धडा मिळाला असं राजेशने सांगितलं. “ज्या दिवशी तुम्ही स्वतःबद्दल विचार करणे थांबवता त्या दिवशी तुम्ही इतरांबद्दल विचार करायला सुरुवात करता आणि तेव्हाच इतर तुमच्याबद्दल विचार करायला लागतात. हे एक वर्तुळ आहे. तुम्हाला काहीतरी अर्थपूर्ण करायचे असेल तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे विचार करावा लागेल. आता जेव्हा माझी मुलं माझा उल्लेख अभिनेता व शेतकरी म्हणून करतात तेव्हा मला खूप अभिमान वाटतो,” असं राजेश म्हणाला.
आता राजेश अनेक सीरिज व चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसतो. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’मध्ये राजेशची भूमिका खूप महत्त्वाची होती. त्याने सतीश शाह, रत्ना पाठक शाह, रुपाली गांगुली आणि सुमीत राघवन यांच्याबरोबर काम केलं होतं. त्याच्या पात्राला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय त्याने ‘शरारत’, ‘घर एक मंदिर’, ‘बा बहू और बेबी’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘चिंटू चिंकी और एक बडी सी लव्ह स्टोरी’, ‘बडी दूर से आए है’ या मालिकांमध्ये काम केलंय. काही चित्रपटांमध्येही त्याने भूमिका केल्या आहेत.