मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं आज (१२ मे रोजी) निधन झालं आहे. रंगोत्सवात व्यासपीठावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबद्दल त्यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजेश देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून ही दुःखद बातमी प्रेक्षकांना दिली. सतीश जोशी यांचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले. ओम शांती ओम.”

सतीश जोशींच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून राजेश देशपांडेंनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “भूमिका साकारताना रंगभूमीवर देह ठेवणे म्हणजे खरोखर परमभाग्य. सतीश जोशी आपण कायम प्रेक्षकांच्या लक्षात रहावं.आपल्याला तमाम रंगकर्मीं आणि नाट्यरसिकानतर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.” अशी कमेंट एका चाहत्यानं केली. तर “अत्यंत दुःखद बातमी, भावपूर्ण श्रद्धांजली” अशाप्रकारच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.

हेही वाचा… “माझ्या बारीक मित्रा तुझी खूप…”, ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ फेम मंदार चांदवडकरांची कवी कुमार आझाद यांच्या आठवणीत खास पोस्ट, म्हणाले…

सतीश जोशींनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. झी मराठीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतील त्यांची भूमिकादेखील गाजली होती. ‘यशोदा गोष्ट श्यामच्या आईची’ या मालिकेत ते शेवटचे झळकले होतं. दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांच्या बहुतेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. सतीश जोशींच्या निधनाची बातमी कळतानाचं सिनेसृष्टीतील कलाकारांना खूप मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा… “लहान बहिणीला मारायचा…”, कुशल बद्रिकेच्या आईने सांगितली त्याच्या बालपणीची आठवण, म्हणाल्या…

अभिनेते अतुल काळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतीश जोशींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी सतीश जोशींचा फोटो शेअर करत लिहिलं, “जोशी गुरुजी यांचं आज निधन झालं. त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला खूप सपोर्ट केला होता. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती.”

अनेक कलाकारांनी रंगभूमीवर अखेरचा श्वास घेतला आहे. सतीश जोशी यांना देखील रंभूमीवरच देवाज्ञा झाली. ‘सृजन द क्रिएशन’ या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात सतीश जोशी देखील सहभागी झाले होते. सृजनोस्तव या रंगोत्सवाचा कार्यक्रम सुरू असतानाच त्यांचं निधन झालं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satish joshi passed away while performing on stage dvr