‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये जानेवारीमध्ये मोठा बदल झाला. अचानक या मालिकेतून मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानची एक्झिट झाली. तिची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळेने घेतली. यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली. तसंच तेजश्रीच्या एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी मोठ्या प्रमाणात घसरला. शिवाय मालिका प्राइम टाइमवरून दुपारच्या वेळेत प्रसारित होतं आहे. अशातच आता तेजश्री प्रधानच्या अचानक एक्झिटवर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
लवकरच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ सोहळा पार पडणार आहे. १६ मार्चला सायंकाळी ७ वाजता हा सोहळा प्रसारित होणार आहे. त्यानिमित्ताने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांनी ‘तारांगण’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तेजश्री प्रधानच्या एक्झिटवर भाष्य केलं.
तेजश्री प्रधानच्या एक्झिटवर तुम्ही कधी बोलला नाहीत. तर यावर तुमचं मत काय आहे?, असं सतीश राजवाडेंना विचारण्यात आलं. तेव्हा सतीश राजवाडे म्हणाले, “तेजश्री ही फार अप्रतिम कलाकार आहे आणि खूप जुनी मैत्रीण आहे. प्रत्येकाला स्वतःची काही कारणं असू शकतात. आम्ही सगळे खूप प्रोफेशनल आहोत. पुढे कधी संधी मिळाली तर एकत्र काम करूच.” त्यानंतर त्यांना विचारलं की, तिच्या एक्झिटचं नेमकं कारण सांगाल का? यावर सतीश राजवाडे स्पष्टचं म्हणाले, “माझ्याकडे तसं काही कारण नाहीये. नेमकं काय घडलं? हे मी उघड करू शकत नाही. त्यामुळे मला कळलं की तुम्हाला कळवेन.”
पुढे सतीश राजवाडेंना विचारलं, “एखादा नवीन कलाकार आल्यावर त्याला प्रेक्षकांनी स्वीकारायला वेळ लागतो. तर तुम्ही प्रेक्षकांच्या या मानसिकतेचा विचार करता का?” याविषयी सतीश राजवाडे म्हणाले की, रसिक प्रेक्षकांच्या मानसिकतेचा आम्ही विचार करतो. म्हणून आज आम्हाला त्यांचं एवढं प्रेम प्राप्त होतंय. पण, कसं आहे ना, व्यक्ती स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा भाग आहे. जसं आज आपण ‘स्टार प्रवाह’ पुरस्कारासाठी भेटलोय आणि तुम्ही मला जसा हा प्रश्न विचारला आहे. तसं प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य असतं. आम्ही प्रत्येकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला मान देतो. त्याचा सन्मान करतो. आम्ही प्रचंड प्रमाणात त्या व्यक्तीच्या मतांचा आदर करतो.
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानने प्राजक्ता माळीच्या पावलावर पाऊल ठेवल्याचं पाहायला मिळालं. प्राजक्ता माळीचे गुरु श्री श्री रविशंकर आहेत, जे आता सर्वश्रुत आहे. याच श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात तेजश्री काही दिवस वास्तव्यास होती. याच आश्रमातील तेजश्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याशिवाय तेजश्री आता ठिकठिकाणी कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहे.