‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही ‘झी मराठी’वरील मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तितीक्षाने आजपर्यंत ‘असे हे कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’, ‘सरस्वती’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
तितीक्षा खऱ्या आयुष्यात ‘दृश्यम २’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अशातच सिद्धार्थने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सिद्धार्थने तितीक्षाबरोबरचे दोन खास फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्याला “लेविटेटिंग- आय वाँट यू बेबी” हे इंग्रजी रोमँटिक गाणं लावलं आहे. याशिवाय या फोटोमध्ये त्याने तितीक्षाला टॅग केलं असून स्वप्नवत (ड्रीमिंग) असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या या फोटोंवरुन दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडेने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. यापूर्वी अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येही सिद्धार्थची झलक पाहायला मिळाली होती. मात्र, अद्याप या दोघांनी रिलेशनशिपच्या चर्चांवर अधिकृत भाष्य केलेलं नाही.