पडद्यावर दिसणारे कलाकार हे विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ किंवा रील शेअर करत ते चाहत्यांचे मनोरंजन करतात. तर अनेकदा मुलाखतींच्या माध्यमातून हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी हे कलाकार शेअर करतात. आता नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक कलाकारांनी विविध पद्धतीने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी नवीन वर्षाचे स्वागत कसे केले हे व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहे. आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’फेम अभिनेत्री श्वेता मेहेंदळे(Shweta Mehendale)ने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
श्वेता मेंहदळेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वर्षाच्या पहिल्याच दिवशी ती जवळच्या व्यक्तींबरोबर ट्रेकसाठी गेल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने म्हटले, “नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही नाशिकमधील रामशेज किल्ल्यावरती आलोय. वर्षाच्या पहिल्या दिवशी पहिला ट्रेक.” पुढे तिने तेथील सुंदर दृश्य दाखवले आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेते व श्वेता मेहेंदळेचे पती राहुल मेहेंदळे, अभिनेता यश प्रधान व त्याची पत्नीसुद्धा दिसत आहेत. त्यांनीदेखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनीदेखील नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री नुकतीच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेत इंद्राणी ही भूमिका तिने साकारली होती. महत्त्वाचे म्हणजे याच मालिकेत राहुल मेहेंदळेंनीदेखील भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतल्याचे पाहायला मिळाले. या मालिकेत त्यांनी शेखर राजाध्यक्ष ही भूमिका साकारली होती. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे यांच्याबरोबरच या मालिकेत तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अजिंक्य ननावरे हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते. या कलाकारांचे सेटवरील अनेक व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत असत.
हेही वाचा: “त्या रोज पॅक अप झालं की…”, अलका कुबल यांनी सांगितली स्मिता पाटील यांची आठवण; म्हणाल्या…
श्वेताच्या कामाबद्दल बोलायचे तर ती ‘आभाळमाया’, ‘त्रिभंगा’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिका व चित्रपटांत तिने काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर राहुल मेहेंदळेंनी ‘राजवाडे अँड सन्स’, ‘फर्जंद’, ‘चेकमेट’, ‘असा मी तसा मी’, ‘संदूक’ या चित्रपटांत भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेनंतर हे कलाकार जोडपे कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.