रहस्यमय कथानकामुळे ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर जवळ आला आहे.
रुपालीचं सत्य अद्वैतला केव्हा समजणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर प्रेक्षकांची ही इच्छा २४ डिसेंबरच्या महाएपिसोडमध्ये पूर्ण होणार आहे. नेत्रा-इंद्राणीने जंगलात सर्पलिपीच्या अर्थाचं लपवून ठेवलेलं रहस्य रूपालीला नागामुळे समजतं. याशिवाय रुपालीला ती विरोचक असल्याचीही जाणीव होती. विरोचकाचा सेवक कलियुगात अद्वैतच्या रुपात वावरत असतो.
रूपालीला विरोचकाचं सत्य कसं समजलं असेल याबद्दल नेत्रा, इंद्राणी व शेखर यांना आश्चर्य वाटतं. आता काहीही करून अद्वैतला जपायला हवं त्याचबरोबर रूपालीचं खरं रूप उघड होण्यासाठी योजना आखायला पाहिजे, असं ते तिघेही ठरवतात.
दुसरीकडे, अद्वैत नेत्राला विचारतो की, जर मी विरोचकाचा सेवक होतो, तर कलियुगात आता विरोचक कोण आहे. त्याचवेळी नेत्रा ठरवते की आता अद्वैतपासून सत्य लपवण्यात काहीच अर्थ नाही आणि ती रुपालीबद्दल अद्वैतला संपूर्ण माहिती सांगते. योजना आखल्याप्रमाणे नेत्रा-इंद्राणी आणि शेखर, रूपालीला आपल्या जाळ्यात ओढतात. रूपालीला त्यांच्या योजनेचा पत्ता लागत नाही. त्यामुळे ती त्यांच्या जाळ्यात ओढली जाते. त्यामुळे आता लवकरच अद्वैतला रूपालीचं खरं रूप कळणार आहे.
दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचा विशेष भाग २४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे.