‘झी मराठी’ वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी ‘सावळ्याची जणू सावली’ मालिका सुरू झाली आणि अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. सध्या मालिकेत सारंग आणि सावलीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. नक्की कोणाचं लग्न कोणाशी होणार? हे पाहणं उत्सुकतेचं आहे. या लग्नसोहळ्यानिमित्तानेच मालिकेतील कलाकार मंडळी विविध एंटरटेनमेंट चॅनेलशी संवाद साधत आहेत. याच वेळी मालिकेतील तिलोत्तम मेहेंदळे म्हणजेच अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी स्वतःच्या लग्नातला एक किस्सा सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री सुलेखा तळवकर यांनी नुकताच ‘स्टार मीडिया मराठी’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी त्यांना त्यांच्या लग्नातील एक किस्सा सांगायला सांगितला. तेव्हा सुलेखा तळवलकर म्हणाल्या, “एक किस्सा तर मला इतका छान आठवतोय. दुपारचा मुहूर्त होता. त्याला गोरख मुहूर्त म्हणतात. तर तेव्हा लग्न लागतं. माझा दुपारी ३.५२चा लग्नाचा मुहूर्त होता. लगेच ५ किंवा ५.३०ला रिसेप्शनची तयारी सुरू झाली. तो लूक वगैरे बदलतो ना. विधीला बसतो तेव्हा वेगळा लूक असतो. आपले हेअर वेगळे असतात, साडी वेगळी असते, मेकअप वेगळा असतो आणि संध्याकाळी रिसेप्शनच्या एकदम वेगळा लूक असतो. त्यामुळे इतकी घाई गडबड झाली होती.”

हेही वाचा – Video: “तुरू तुरू चालू नको…”, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील पुड्या आणि राजश्रीचा जबरदस्त डान्स, सूर्यादादा म्हणाला…

पुढे सुलेखा तळवलकर म्हणाल्या, “लग्नाचे विधी वगैरे संपून मग मी लगेच लूक बदलायला घेतला होता. माझे केस मोकळे सोडले होते. साडी वगैरे बदलून झाली होती. मेकअप बदलला नव्हता आणि कपाळावर टिकली पण नव्हती. माझी सासूबाई सगळ्यांनाच माहित आहे. कायम घोड्यावर सवार असायची. तेव्हा ती इतकी उतावळी झाली होती की, मी ज्या खोलीत तयारी करत होते. तिथला दरवाजा सतत वाजवत होती आणि म्हणत होती, झालं का गं बाळा? झालं का गं बाळ? सतत तिचं सुरू होतं. तर मी म्हटलं, हो हो…झालं मी आले. तिने म्हटलं, एक मिनिट दरवाजा उघड ना. फक्त एक मिनिट. तर मी दार उघडलं आणि म्हटलं, अहो, माझं पाचचं मिनिटात होईल. फक्त हेअर करायचे आहेत. त्या म्हटल्या, हो ठीक आहे. वंदू आली आहे म्हणजे वंदू मावशी. तर वंदना गुप्ते भेटलायला आल्या होत्या. म्हणून त्या म्हणाल्या, जरा तिला भेट आणि मग तू निवांत तयार हो. म्हणून तिने मला हाताला धरलं आणि बाहेर आणलं.”

हेही वाचा – लेक-जावयासाठी परिणीती चोप्राच्या आईने रेखाटलं सुंदर चित्र, राघव चड्ढा सासूबाईंना म्हणाले…

“वंदू मावशी मला भेटली. तेव्हा माझ्या कपाळावर टिकली नव्हती. तर ते पाहून वंदू मावशी म्हणाली, काय गं लग्नाच्या दिवशी कपाळीवर टिकली नाही. ही घे म्हणून तिने स्वतःच्या कपाळावरची टिकली काढली आणि माझ्या कपाळी लावली. मी म्हटलं, ओके आता मी आतमध्ये जाते आणि बदलून येते. तितक्यात सासू म्हटली, चल स्टेजवर…चल. आली मोठी. माझे केस तसेच मोकळे, हेअरस्टाइल केलेली नव्हती. फक्त साडी बदलेली होती आणि मग मी रडारड. नशीबाने वंदू मावशीने मला टिकली लावली होती. नाहीतर मी तशीच स्टेजवर गेले असते,” असा सुलेखा तळवलकरांनी स्वतःच्या लग्नातील मजेशीर किस्सा सांगितला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savalyachi janu savali fame sulekha talwalkar share story of vandana gupte in her marriage pps