Marathi Actress Savita Malpekar : मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकरांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीबाबत स्पष्ट मत मांडलं आहे. गेली अनेक वर्षे त्या मराठी नाटक, टेलिव्हिजन मालिकांमार्फत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सविता मालपेकर त्यांच्या प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत घेऊन प्रेक्षकांचं मन नेहमीच जिंकून घेतात. त्या अतिशय स्पष्टवक्त्या आहेत, न पटणाऱ्या मुद्द्यांविषयी सविता मालपेकर नेहमीच आपलं ठाम मत मांडताना दिसतात. नुकत्याच ‘कॉकटेल स्टुडिओ’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने इंडस्ट्रीत होणाऱ्या गटबाजीबद्दल भाष्य केलं आहे. यासंदर्भात त्यांनी कोणाचं नाव घेतलंय, त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊयात…
सविता मालपेकर सांगतात, “मी अनेक दिग्गज लोकांबरोबर काम केलं. पण त्यानंतर काही वर्षांनी इंडस्ट्रीत गॉसिप करणं, गटबाजी होऊ लागली. मी नेहमीच नावं घेऊन बोलते…मी कोणालाच घाबरत नाही. मला काय घेणदेणं आहे? इंडस्ट्रीत सर्वात पहिलं ग्रुपिझम चंद्रकांत कुलकर्णींनी आणलं. माझं काय म्हणणं आहे आपण इथे काम करायला आलो आहोत मग गटबाजी का करावी? मला या गोष्टी खरंच खटकतात.”
हेही वाचा : बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळी ‘त्या’ बोल्ड व्हिडीओमुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले, “ही आपली संस्कृती नाही”
सविता मालपेकर पुढे म्हणाल्या, “ही सगळी माणसं खूप छान आहे. माणूस म्हणून हे लोक वाईट अजिबात नाहीयेत. पण, हे गटबाजी वगैरे का करायची? या गोष्टी मला खूप खटकतात. हा माझा ग्रुप, ही माझी माणसं, हे माझे कलाकार…आम्ही एवढेच जण काम करणार… अरे का? मी तिकडचा आहे म्हणजे माझे तिकडचेच कलाकार आहे…हे असं सगळं इंडस्ट्रीत यापूर्वी अजिबात नव्हतं.”
“कोकणातले सर्वाधिक कलाकार मराठी इंडस्ट्रीत आहेत. अनेक मोठमोठ्या माणसांनी कधीच ग्रुपिझम केलं नाही. मग आपल्या इंडस्ट्रीत गटबाजी हा प्रकार का आला, तो कुठून आला? हे करण्याची गरज का वाटली? आता अनेक लोक म्हणतील मुलाखतीत मी थेट चंद्रकांत कुलकर्णींचं नाव घेतलं. पण, मला माहितीये मला तो नाटकात घेणार नाहीये. मी हे इथे बोललीये म्हणजे तो मला घेणार नाही अशातला भाग नाही. त्याचे कलाकार ठरलेले असतात. त्या कलाकारांच्या पलीकडे तो जात नाही. मी बोलायला घाबरत नाही, कारण…माझ्या नशिबात असेल तर तो घेईल. याआधी मी त्याच्या मालिकेत काम केलंय. पण, मला खरंच वाईट वाटतं. कारण, ही एवढी चांगली माणसं आहेत मग असं का करतात हे खटकतं.” असं सविता मालपेकरांनी सांगितलं.