Savita Malpekar On Kiran Mane : अभिनेते किरण माने आणि सविता मालपेकर या दोघांनी एका लोकप्रिय मालिकेत एकत्र काम केलं होतं. मात्र, कालांतराने किरण मानेंना या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. यामध्ये त्यांनी सविता मालपेकरांच्या मुलाची भूमिका साकारली होती. त्यामुळे अभिनेत्रीला नुकत्याच दिलेल्या ‘लोकमत फिल्मी’च्या मुलाखतीत या प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. मालिकेच्या सेटवरचे वाद, किरण मानेंची भूमिका या संपूर्ण प्रकरणावर सविता मालपेकरांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

सविता मालपेकर म्हणाल्या, “किरण खूप छान मुलगा आहे. पण, चांगली असणारी माणसं अशी का वागतात मला समजत नाही. काही गोष्टी माणूस बोलून दाखवत नाही पण, त्याच्या कृतीतून त्या सगळ्या गोष्टी जाणवत असतात. यापूर्वीच्या मालिकेत सुद्धा आम्ही आई-मुलाची भूमिका साकारली होती. आमचं आधीच बोलणं झालं होतं. मी त्याला बोलले होते की, ‘हे बघ किरण्या चांगलं काम करायचंय, चांगली भूमिका मिळालीये’ प्रत्येक मालिकेत काम करण्याआधी मी संबंधित कलाकारांशी व प्रोडक्शनशी आधीच बोलून घेते. आपण माणसं आहोत त्यामुळे वादविवाद होतात, प्रत्येक माणसाकडून चुका होतात पण, त्या कबूल करण्याची आणि सॉरी म्हणण्याची तयारी असली पाहिजे. तसेच प्रत्येक सेटवरची भांडणं ही त्या संबंधित सेटपुरती मर्यादित राहिली पाहिजेत. सेटच्या बाहेर ती भांडणं जाता कामा नयेत.”

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने सुरू केला नवीन व्यवसाय! अनोख्या बिझनेसचं सर्वत्र होतंय कौतुक

सविता मालपेकर ( Savita Malpekar ) पुढे म्हणाल्या, “आपल्याला एकत्र कामं करायची असतात त्यामुळे हेवेदावे करून उपयोग नसतो. आताही माझं आणि किरणचं नातं खूप छान आहे. एका कोणामुळे शंभर लोक उपाशी राहिलेले मला चालणार नव्हतं. किरणने काय केलं, तो बाजू मांडत बोलत होता वगैरे सर्व मला मान्य आहे. पण, त्याला न सांगता काढलेलं नाही. त्याला चॅनेलने चारवेळा वॉर्निंग दिली होती. त्याला नेमकं कोणत्या कारणासाठी काढलंय… ते कारण मला आजही समजलेलं नाही. मी ताराराणीचं शूटिंग करत होते आणि मला तेव्हा सेटवर समजलं की, किरण मानेला काढलं… मला माहितीच नव्हतं. त्याला काढण्याआधी एक मिटींग झाली होती. त्यामध्ये त्याने माफी सुद्धा मागितली होती. त्यानंतर याला का काढलं हे मला समजलं नाही. तो चुकला असेल…ते त्याला मान्य आहे की नाही मला माहिती नाही. कारण, त्यानंतर आम्ही तसं बोलायला भेटलोच नाही.”

Savita Malpekar
किरण माने व सविता मालपेकर ( Savita Malpekar )

हेही वाचा : Video : ‘कलर्स मराठी’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत मुक्ता बर्वेची एन्ट्री! जबरदस्त लूक अन् प्रोमोने वेधलं लक्ष

“किरण तिथेच चुकला…”, सविता मालपेकर काय म्हणाल्या?

“कलाकार, प्रोडक्शन या आपआपसांत घडलेल्या भानगडी राजकारणी लोकांपर्यंत घेऊन जाण्याइतपत काहीच घडलं नव्हतं. किरण तिथेच चुकला. बरं राजकारण्यांपर्यंत किरण गेला हे त्याचं स्वत:चं डोकं नव्हतं. त्याच्यामागे एक शक्ती होती आणि त्या शक्तीमुळे तो असं सर्व करत होता, हे माझं ठाम मत आहे. माणसाला कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे आणि जोवर हे कळत नाही तोपर्यंत वाद वाढत जातात. तो सारखं म्हणायचा, जाता येता टोमणे मारायचा मी पण लक्ष द्यायचे नाही. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. ज्यांच्यामुळे हे झालं, त्यांच्याही चुका असतील. एकतर आमची निर्माती फार गरीब आहे… तशी निर्माती मिळणं फार कठीण आहे. इतकी साधी, सिंपल ती आहे. अशा बाईला जेव्हा त्रास होतो…तेव्हा एक बाई म्हणून मलाही त्रास झाला. त्या मालिकेत मी सर्वात मोठी होती, त्यामुळे सगळी माझीच मुलं होती. त्यात ती मालिका सुद्धा चांगली सुरू होती. बरं या सगळ्यात नुकसान एकट्या किरण मानेचं झालं असतं का? नाही! युनिटच्या १०० माणसांचा काहीही दोष नसताना ती उपाशी राहिली असती. त्यांची कुटुंब कोण पोसणार होतं… म्हणून मी त्यावेळी बोलले. मी तेव्हा सर्वांच्या बाजूने बोलले याचं कारण, माझं युनिट वाचवण्यासाठी मी बोलले आणि त्यालाही हे समजलं पाहिजे होतं की, वाद हा तेवढ्यापुरता असला पाहिजे. अगदी टोकाचं असेल तरच मीडियासमोर जाणं योग्य आहे. प्रत्येकाला कामाची गरज असते, त्यामुळे सर्वांनी आनंदाने काम करावं असं मला वाटतं.” असं स्पष्ट मत सविता मालपेकरांनी ( Savita Malpekar ) व्यक्त केलं आहे.