‘वादळवाट’, ‘आभाळमाया’, ‘अग्निहोत्र’, ‘पुढचं पाऊल’ अशा छोट्या पडद्यावरच्या असंख्य मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. मार्च २०१६ च्या सुमारास ‘काहे दिया परदेस’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेतील कलाकार, याचं शीर्षक गीत आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेत अभिनेत्री सायली संजीव आणि ऋषी सक्सेना यांची फ्रेश जोडी झळकली होती. या मालिकेला प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद मिळाला आणि गौरी-शिवची जोडी सर्वत्र चर्चेत आली.
‘काहे दिया परदेस’ या मालिकेनंतर अभिनेत्री सायली संजीव ‘परफेक्ट पती’ या हिंदी मालिकेत सुद्धा झळकली होती. यादरम्यान तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं. ‘मन फकिरा’, ‘झिम्मा’, ‘हर हर महादेव’, ‘सातारचा सलमान’, ‘फुलराणी’, ‘झिम्मा २’, ‘ओले आले’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये सायलीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांमध्ये रमलेली सायली पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर केव्हा झळकणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेत तो क्षण आता जवळ आलेला आहे.
सायली संजीव आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर कमबॅक करणार आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सायलीने ती लवकरच मालिकेत काम करणार असल्याचं सांगितलं होतं. आता यंदाच्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्यात प्रेक्षकांना सायलीची झलक पाहायला मिळत आहे.
दरवर्षी पुरस्कार या सोहळ्याला नवीन मालिकांची घोषणा केली जाते. यादरम्यान नवीन मालिकांमध्ये झळकणारे कलाकार एकत्र परफॉर्मन्स सादर करतात. त्यामुळे सायलीला सादरीकरण करताना पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
सायलीसह या मालिकेत ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेता चेतन वडनेरे झळकणार आहे. कारण, सायली आणि चेतन या पुरस्कार सोहळ्यात रोमँटिक गाण्यावर एकत्र थिरकत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. यावरून सायली-चेतन या दोघांनी एक नवीन मालिका ‘स्टार प्रवाह वाहिनी’वर येणार आहे हे स्पष्ट झालं आहे.
नेटकऱ्यांनी सुद्धा हा प्रोमो पाहून नवीन मालिका केव्हा येणार असे प्रश्न कमेंट्समध्ये विचारले आहेत. आता सायली आणि चेतन यांच्या नव्या मालिकेबद्दल संपूर्ण माहिती प्रेक्षकांना ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्यात ( १६ मार्च ) मिळणार असल्याची दाट शक्यता आहे.