महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना काही दिवसांपूर्वीच यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर, त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना नुकत्याच पार पडलेल्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री सायली संजीवने तिच्या लाडक्या मम्मा-पप्पांचं कौतुक केलं आहे.
अशोक व निवेदिता सराफ हे दोघं ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्री सायली संजीवला आपली मुलगी मानतात. सायली व निवेदिता यांनी नुकतीच एकत्र ‘स्टार परिवार पुरस्कार’ सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी निवेदिता यांनी लाडक्या लेकीला पाहून लगेच तिला मिठी मारली. यानंतर दोघींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपल्या मम्मा-पप्पांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सायली संजीव म्हणते, “मला खरंच खूप जास्त छान वाटतंय. सर्वांसाठीच ही खूप जास्त अभिमानाची गोष्ट आहे. कारण, पप्पांना पद्मश्री मिळाला. त्यानंतर मम्माला जीवनगौरव मिळाला. खरं सांगायचं झालं तर, ती माझी मम्मा पण वाटत नाही…इतकी ती तरुण दिसते. ती सध्या खूप काम करतेय. तिच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ती मालिका करते, चित्रपटांच्या प्रमोशनला उपस्थित असते. याशिवाय सिनेमाच्या प्रीमियरला जाते…ती सगळं काही करते.”
“माणूस म्हणून ती सगळ्यांसाठी २४ तास उपलब्ध असते. तुम्हाला कसलीही गरज भासली तरी, तुम्ही तिला कधीही फोन करू शकता. फोन करा, मेसेज करा…ती कायम सगळ्यांच्या मदतीसाठी तत्पर असते. मी हे फक्त तिची मुलगी म्हणून बोलत नाहीये…मम्मा सर्वांसाठी असते.” असं सायलीने ‘तारांगण’शी संवाद साधताना सांगितलं.
अशोक व निवेदिता सराफ यांचं सायलीबरोबरचं खास नातं
अशोक सराफ यांना पहिल्यांदा सायली संजीव एका चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चला भेटली होती. हा किस्सा सांगताना अभिनेत्री म्हणाली होती, “मी माझ्या वडिलांना बाबा म्हणायचे. अशोक सराफ सरांनी मला स्वत:हून सांगितलं की, मग तू मला ‘पप्पा’ म्हणत जा. ‘काहे दिया परदेस’मध्ये त्यांनी मला पाहिलं होतं. त्याआधी आमची ओळखही नव्हती. ते न चुकता मालिका पाहायचे. यानंतर त्यांच्या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चला आम्ही भेटलो. माझ्या वडिलांच्या निधनानंतर पप्पांच्या रुपाने देवाने माझ्या आयुष्यातली ती पोकळी भरून काढली. आमचं नातं खूप खास आहे.”