६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारात ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा’चा मान मिळवलेल्या ‘गोष्ट एका पैठणी’ या चित्रपटाची खूप चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला २४ तासातच १० लाख लोकांनी पाहिलं होतं. सर्वांनाच हा ट्रेलर खूप आवडला होता. आता हा ट्रेलर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अभिनेत्री सायली संजीव हिने एक व्हिडीओ पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली.

सायलीने नुकताच ‘गोष्ट एका पैठणी’ चित्रपटाचा ट्रेलर पुन्हा सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या चित्रपटातून अतिशय सामान्य स्वप्न उराशी बाळगून, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सर्वसामान्य गृहिणीचा हा असामान्य प्रवास दाखवण्यात येणार आहे. ही गोष्ट आहे एका स्वप्नाची… ही गोष्ट आहे एका पैठणीची… एक पैठणी असावी, इतके साधे स्वप्न बाळगणारी इंद्रायणी, तिच्या स्वप्नांबाबत खूप सकारात्मक दिसत आहे. मात्र या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास खडतर दिसतोय. तिचे पैठणीचे हे स्वप्न पूर्ण होईल का, की तिचा हा प्रवास तिला एका वेगळ्या वाटेवर नेणार? या प्रश्नांची उत्तरं या चित्रपटातून उलगडणार आहे.

आणखी वाचा : Video: जॅकलिन फर्नांडिसने सिद्धार्थ जाधवला दिल्या मराठीत शुभेच्छा, म्हणाली…

हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने लिहीलं, “आपल्या स्वप्नांसाठी जगणाऱ्या इंद्रायणीची प्रेरणादायी गोष्ट! रुपेरी पडद्यावर आलाय ‘पैठणी’ चा भरजरी ट्रेलर…’गोष्ट एका पैठणीची’ २ डिसेंबर २०२२ पासून जवळच्या चित्रपटगृहात.” या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

हेही वाचा : “मी ज्यांना प्रपोज केलं त्यांनी…”; सायली संजीवचा प्रेमाबद्दल मोठा खुलासा

मंत्रा व्हिजन प्रस्तुत, अक्षय विलास बर्दापूरकर, पियुष सिंग, गोल्डन रेशिओ फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, लेकसाईड प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता निर्माते असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत.

Story img Loader