शाहीर शेख हा हिंदी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी तो चाहत्यांची शेअर करत असतो. नुकताच त्याच्या कुटुंबीयांचा जीव एका कठीण प्रसंगातून वाचला आहे. त्यांच्या बिल्डिंगमध्ये आग लागली होती आणि यातून त्याचे कुटुंबीय सुखरूप बचावले.
शाहीरची पत्नी रुचिका कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही घडलेली घटना सांगितली. तिने लिहिलं, “रात्री दीड वाजता आम्हाला फोन आला की बिल्डिंगमध्ये आग लागली आहे. आम्ही दार उघडून पाहिलं तर सगळीकडे दूर होता. आम्हाला काहीही दिसत नव्हतं. त्यातून बाहेर पडणं आमच्यासाठी अशक्य होतं. तिथे वाट पाहण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. पण आम्ही किती वेळ वाट पाहणार होतो? मी खूप घाबरले होते. त्यावेळी शाहीर घरी नव्हता म्हणून मी त्याला जे घडलं ते फोन करून सांगितलं. पण तो तिथे घाबरून जाणार नाही याची मी काळजी घेतली होती.”
आणखी वाचा : “तुझी बदनामी करण्यात आली पण…” करण जोहरने ‘पठाण’साठी केलेली पोस्ट चर्चेत
पुढे ती म्हणाली, “माझ्याबरोबर माझे व्हीलचेअरवर असणारे वडील आणि १६ महिन्यांची मुलगी होती. त्यामुळे १५व्या मजले उतरून खाली जाणं कठीण होतं. आम्ही टॉवेल ओले केले आणि ते खिडक्यांच्या फटींमध्ये, दाराच्या फटींमध्ये लावले जेणेकरूनघुर आत येणार नाही. तो धूर वेगाने घरात पसरत होता. तेवढ्यात अग्निशामन दलाचे कर्मचारी आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की, टॉवेल ओले करून नाकावर पकडा जेणेकरून आम्ही बेशुद्ध पडणार नाही. ते आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत असा विश्वास त्यांनी आम्हाला दिला.”
“त्यावेळी खाली शाहीर आणि इतर लोक अग्निशामन दलाच्या गाडीला जागा होण्यासाठी बिल्डिंगमधील गाड्यांना धक्का मारून बाजूला सारत होते. अखेर साडेतीन वाजता शाहीर माझा दीर आणि चार अग्निशामन दलाचे कर्मचारी आमच्याजवळ आले. सर्वात आधी आम्ही आई आणि माझ्या मुलीला बाहेर काढलं नंतर शाहीर आणि माझा दीर वडिलांना व्हीलचेअरवरून खाली घेऊन गेले. हे सगळं होईपर्यंत पाच वाजले होते,” असंही तिने सांगितलं.
हेही वाचा : अभिनेता शाहीर शेखच्या वडिलांचं निधन, करोनामुळे शरीरात पसरलं होतं इन्फेक्शन
या पोस्टच्या अखेरीस तिने अग्निशामन दलाचे आभारही मानले. रुचिका बरोबरच शाहीरने देखील एक पोस्ट शेअर करत अग्निशामनदलातील कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले. आता त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.