‘द कपिल शर्मा शो’ हा हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एक आघाडीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार्स त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी येतात. कपिल शर्मा आणि या कार्यक्रमातील कलाकार त्यांच्या विनोदाने प्रेक्षकांना आणि सेलिब्रेटींना खळखळून हसवतात. पण शैलेश लोढा यांनी या कार्यक्रमाच्या विनोदाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेमध्ये अभिनेते शैलेश लोढा तारक मेहता ही भूमिका साकारत आहेत. गेली अनेक वर्ष ते या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. या त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमही मिळालं. पण काही महिन्यांपूर्वी ते या मालिकेतून बाहेर पडले. मध्यंतरी ते कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झाले होते. पण त्यानंतर त्यांनी या कार्यक्रमातील विनोदावर टीका केली होती. यानंतर शैलेश लोढा यांना त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. तर आता नुकतंच त्यांनी या सगळ्याबद्दल भाष्य केलं आहे.
शैलेश लोढा यांनी नुकतीच ‘लल्लनटॉप’ला एक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सध्याच्या विनोदाच्या स्थितीबद्दल भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमावर टीका केली. ते म्हणाले, “मी आणि कपिल शर्माने एकत्र काम क्स्लं आहे. २०१२ साली मी आणि कपिल सिंगापूरमध्ये ‘कॉमेडी नाइट्स विथ शैलेश अँड कपिल’ हा शो एकत्र करत होतो. मध्यंतरी मी या कार्यक्रमाबद्दल जे बोललो होतो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी म्हणालो होतो की, मला आत्या आणि आजीने आलेल्या पाहुण्यांशी फ्लर्टिंग करणं आवडत नाही. ही आपली संस्कृती नाही. मी स्वत: अशा गोष्टींसाठी कम्फर्टेबल नाही आणि आजही मी या मुद्द्यावर ठाम आहे.”
पुढे ते म्हणाले, “पण याचा अर्थ असा नाही की मी कपिल शर्माच्या शोमध्ये किंवा कामासाठी जाणार नाही. कारण मी हे सगळं त्याच्या शोमध्ये सांगितलं नव्हते. मी त्यांच्या शोमध्ये गेलो होतो आणि तिथे हिंदी कवितेची ताकदही अधोरेखित केली होती. जेव्हा मी माझी ‘माँ’ कविता तिथे सर्वांना ऐकवली तेव्हा सगळ्या प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या होत्या आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आलेले. कपिल शर्मा एक खूप छान व्यक्ती आणि माणूस आहे. तो माझाही खूप चांगला मित्र आहे.”