‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील मालिका मागील १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील पात्रांनी चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. काही वर्ष ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेमध्ये वरच्या स्थानावर होती. पण हळूहळू मालिकेच्या कथानकामध्ये रटाळपणा आला. त्याचवेळी दिशा वकानी, भव्य गांधी अशा काही कलाकारांनी मालिका सोडल्यामुळे त्याचा परिणाम टीआरपीवर झाला.
मालिकेच्या सुरुवातीपासून अभिनेता शैलेश लोढा ‘तारक मेहता’ हे पात्र साकारत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनीही मालिकेला निरोप दिला. अनेक वर्षांपासून एकच भूमिका करत असल्याचा कंटाळा आल्याने त्यांनी मालिका सोडली अशी प्राथमिक माहिती सांगण्यात आली. पण पुढे मालिका आणि त्यांच्या अन्य कार्यक्रमांच्या तारखांमध्ये होणारा गोंधळ टाळण्याचे कारण समोर आले. शैलेश आणि या मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्यामध्ये वाद झाल्याने त्यांनी काम करण्यास नकार दिला असेही बरेचसे लोक म्हणत होते.
शैलेश लोढा अभिनयासह लेखनदेखील करतात. त्यांना कविता करायचा छंद आहे. त्यांचे कवितावाचनाचे कार्यक्रम वर्षभर सुरु असतात. त्यांनी सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी चार ओळींची छोटी कविता केली आहे. या कवितेच्या शेवटी त्यांनी ‘जे त्याला सोडून गेले, त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही’ अशी ओळ लिहिली आहे. या कवितेद्वारे ते ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांवर अप्रत्यक्षपणे टीका करत असल्याचा अंदाज लावला जात आहे. त्यांच्या चाहत्यांनी या फोटोखाली कमेंट्स करत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
आत्तापर्यंत दिशा वकानी, भव्य गांधी, शैलेश लोढा, नेहा मेहता, निधी भानुशाली, गुरुचरण सिंह अशा कलाकारांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडली आहे. मध्यंतरी दयाबेन हे लोकप्रिय पात्र साकारणाऱ्या दिशा वकानींसह निर्माते मालिकेमध्ये परत येण्याच्या मुद्द्यावरुन चर्चा करत होते.