टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त पण तरीही लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. सध्या या शोचं १६ पर्व सुरू आहे. या पर्वाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. विशेषतः यंदाच्या पर्वातील सदस्य शालीन भानोत सातत्याने काही ना काही कारणाने सर्वाचं लक्ष वेधून घेताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे आणि गौतम विज यांच्यातील टास्कच्या वेळी शालीन भानोतचा रुद्रावतार पाहायला मिळाला होता. त्यानंतर शालीन सातत्याने रागावल्याचं आणि अग्रेसीव्ह झाल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे सोशल मीडियावरून त्याच्यावर टीका होताना दिसतेय. पण याबाबत काही वर्षांपूर्वीच त्याची पूर्वाश्रमीची पत्नी दलजित कौरने सर्वांसमोर खुलासा केला होता.
शालीन भानोत बिग बॉसच्या घरात कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन घरातील सदस्यावर चिडताना आणि त्यांच्याशी भांडताना दिसत आहे. प्रत्येक वेळी त्याचं अग्रेशन पाहून घरातील सदस्य हैराण झाले आहे. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वीच तो त्याला तपासायला आलेल्या डॉक्टरलाशीही गैरवर्तन करताना दिसला होता. पण शालीनच्या या रागाची झलक याआधीही पाहायला मिळाली आहे. २०१५ मध्ये शालीनच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते.
शालीन भानोतने पूर्वाश्रमीची पत्नी दलजित कौरपासून २०१५ साली घटस्फोट घेतला आहे. दलजित आणि शालीन यांनी २००९ साली लग्न केलं होतं. मात्र २०१५ मध्ये दोघांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. त्यावेळीही अभिनेत्याचा रागच या घटस्फोटाचं कारण असल्याचं बोललं जातं. अभिनेत्रीने शालीनच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यात तिने शालीनवर मारहाण आणि कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. एवढंच नाही तर शालीनने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असंही तिने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.
दलजित कौरने दाखल केलेल्या तक्रारीत शालीनकडून अभिनेत्रीला मारहाण झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. विशेष म्हणजे शालीनच्या या वागण्यावर दलजितच्या सासू सासऱ्यांनीही आपल्या मुलाची पाठराखण केली होती. दलजितने सांगितलं होतं की, “शालीनने एकदा माझा गळा पकडला आणि माझं डोकं भिंतीवर आपटलं होतं. त्यानंतर तिने घरातलं फर्निचर सगळीकडे फेकलं होतं. ४० मिनिटं त्याने मला एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. नंतर माझ्या हाऊसहेल्परने मला वाचवलं होतं.”
आणखी वाचा- शालीनची टीनाशी वाढती जवळीक; पूर्वाश्रमीची पत्नी दलजीत म्हणाली, “हे सगळं पाहून मला…”
आपल्या तक्रारीत दलजितने शालीन भानोतवर विवाहबाह्य संबंधांचाही आरोप केला होता. ती म्हणाली, “शालीन जास्तीत जास्त वेळ घरापासून दूर राहत असे त्यामुळे मी आमच्या बाळाच्या सेफ्टीसाठी घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेतले होते. ज्यात एकदा शालीन एका विवाहित महिलेसह रंगेहात पकडला गेला होता. जेव्हा मी याबाबत माझ्या सासऱ्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी मलाच गप्प बसण्यास सांगितलं आणि असं न केल्यास याचे फार गंभीर परिणाम होतील अशी धमकीही दिली होती.”