‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. १२ फेब्रुवारी २०२४पासून सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यामुळे सध्या ‘पारू’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे, प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक, विजय पटवर्धन, अनुज साळुंखे, संजना काळे, शंतून गंगणे अशा तगड्या कलाकारांनी साकारलेली पात्र आता घराघरात पोहोचली आहेत. पण लवकरच मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार असल्याचं पारू म्हणजे अभिनेत्री शरयू सोनावणेने सांगितलं.
‘पारू’ मालिकेच्या वर्षपूर्तीनिमित्ताने खास सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी पारूचा भव्य पोस्टर लॉन्च केलं. पण हा खरा मालिकेतील सीन आहे. याबाबत शरयू म्हणाली, “पारू किर्लोस्कर कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर होती आणि काही प्रसंग असे घडले, ज्यामुळे पारूला त्या पदावरून हटवलं गेलं. मग अनुष्काला तिच्या जागी ठेवलं. पण किर्लोस्कर कंपनीला नुकसान झाल्यामुळे सगळ्यांचा असा निर्णय होता की, पारूला आपण पुन्हा ब्रँड ॲम्बेसेडर हे पद देऊ. त्यामुळे हा सगळा तामझाम होता.”
पुढे शरयू सोनावणे म्हणाली की, पारूचं तीस फुट पोस्टर आणलं आणि लॉन्च केलं. पण पोस्टर लॉन्चच्या तामझामामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे, जो मी आता सांगणार नाहीये. दिशा परत आलेली आहे. अनुष्का आणि दिशा या दोघीजणी एकत्र मिळालेल्या आहेत. त्यामुळे त्या दोघी मिळून काय-काय करू शकतात? याचा तुम्हीच विचार करा.
“दिशाने अनुष्काला पाठवलं होतं, पण आता दिशा स्वतः तरुंगातून सुटून आली आहे. त्यामुळे तिचं डोकं फिरलेलं आहे. म्हणून मला पण माहीत नाही त्या काय करणार आहेत. या सगळ्या तामझामामध्ये खूप मोठा ट्विस्ट आहे,” असं शरयू सोनावणेने सांगितलं.
दरम्यान, ‘पारू’ मालिकेला वर्ष झाल्याबद्दल शरयू सोनावणे म्हणाली, “मला खूप आनंद होतोय. जितका आनंद सगळ्यांना झालाय त्याच्या चार पटीने आनंद मला होतोय. कारण की हे सोप नाहीये, इथंपर्यंत पोहोचणं आणि टीआरपीच्या नंबरवन टप्प्यावर राहणं. खरंच खूप कठीण आहे. आम्हाला हे काम करताना सगळ्याचं गोष्टींचा अनुभव मिळतो. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आमच्यावर होतं, त्यामुळे आम्ही इथंपर्यंत पोहोचू शकलो. म्हणून तुमचे मनापासून आभार. तुम्ही आमच्यावर भरभरून प्रेम केलं. त्यामुळे आज ‘पारू’ मालिकेने वर्षभराचा टप्पा ओलांडला आहे.”