‘शार्क टँक इंडिया’चं दुसरं पर्व सुरू झालं आहे. यंदाच्या पर्वात भारत पेचा माजी सह-संस्थापक आणि उद्योजक अश्नीर ग्रोव्हर शार्क म्हणून सहभागी झालेला नाही. अश्नीरला ‘शार्क टँक इंडिया’च्या पहिल्या पर्वामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत असतो. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली ज्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
एकीकडे ‘शार्क टॅंक इंडिया’च्या पहिल्या सीझनमधील त्याच्या वागणुकीमुळे प्रेक्षकांकडून त्याच्यावर टीका जरी होत असली तरी दुसरीकडे त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याच्या चाहत्यांशी संपर्कात असतो. तर नुकताच त्याचा मराठमोळा अंदाज चाहत्यांना दिसला. याचं कारण म्हणजे त्याने त्याच्या पत्नीबरोबर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं.
नुकताच अश्नीर त्याच्या पत्नीबरोबर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात देवीच्या दर्शनाला गेला होता. त्याने कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिराबाहेरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोमध्ये त्याच्याबरोबर त्याची पत्नी माधुरीही दिसत आहे. “महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात.. प्राचीन, अध्यात्मिक आणि शांत करणारं ठिकाण,” असं त्याने हा फोटो पोस्ट करत लिहिलं.
त्याने हा फोटो पोस्ट केला असताच त्याच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिलं, “वेलकम टू कोल्हापूर सर! कोल्हापूरच्या स्पेशल खाद्यपदार्थांचा नक्की आस्वाद घ्या.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तुम्ही अंबाबाईचं दर्शन घेतलं हे पाहून छान वाटलं.” तर आणखी एका नेटकरांनी लिहिलं, “कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा नक्की खाऊन पाहा.” त्यामुळे आता तो या कोल्हापूर दौऱ्यामुळे खूप चर्चेत आला आहे.