शार्क टँक इंडियाचे चौथे पर्व सोमवारपासून (६ जानेवारी) सुरू होईल. आता या शोचे अनेक प्रोमो शेअर केले जात आहेत. या प्रोमोमध्ये काही नवीन शार्कदेखील दिसणार आहेत. शोच्या नवीन प्रोमोत सर्व वयोगटातील उद्योजक, त्यांच्या कंपन्यांसाठी आर्थिक मदत मागताना दिसतात. चार मिनिटांच्या व्हिडीओमध्ये अनेक उद्योजकांची व त्यांच्या व्यवसायांची झलक पाहायला मिळते. बऱ्याच उद्योजकांच्या कल्पना, त्यांच्या कमाईचे आकडे पाहून शार्क्स प्रभावित झाल्याचं पाहायला मिळत आहे.
लोकप्रिय युट्युबर गौरव तनेजा या सीझनमध्ये त्याच्या प्रोटीन ब्रँडसाठी डील मिळवण्यासाठी येणार आहे. गौरवच्या पार्टनरने सांगितलं की त्यांची वेबसाइट पासवर्ड प्रोटेक्टेड असूनही त्यांनी एका तासात एक कोटी रुपयांची विक्री केली. “बऱ्याच व्यवसायांसाठी एवढी विक्री करणं हे एक स्वप्न आहे,” असं अमन गुप्ता म्हणाला. तर विनीता सिंहला देखील आश्चर्याचा धक्का बसला. विनीता म्हणाली, “तुम्ही एका तासात एक कोटी रुपये कमावता, मग तुम्ही इथे काय करत आहात?” गौरवने शोमध्ये त्याच्या फिटनेस ब्रँडसाठी डील मिळवण्यासाठी आला होता. तो या ब्रँडच्या माध्यमातून हेल्थ सप्लिमेंट्स, प्रोटीन पावडर व मास गेनर्स असे प्रॉडक्ट्स विकतो.
गौरव तनेजाला ‘शार्क टँक इंडिया 4’ त्याच्या व्यवसायासाठी शार्क्सकडून डील मिळाली की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण त्याचे चाहते त्याला शोमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. गौरवचे यूट्यूबवर ९.२७ मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि इन्स्टाग्रामवर ३.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.
लहान शहरे आणि खेड्यांमधून आलेल्या उद्योजकांची संख्या पाहून शार्क्सदेखील आनंदी झाल्याचं पाहायला मिळालं. काही जणांनी त्यांच्या कंपन्यांची व्हॅल्यूएशन सांगितल्यावर शार्क्स चकित झाले आणि अनेकांशी वाद घालतानाही दिसले. या प्रोमोची झलक पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये शोबद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे. यंदा नवीन शार्क्स दिसणार आहेत, तसेच अनेक उद्योजक आपल्या कंपन्यांसाठी डील मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतील.
नमिता थापर, अनुपम मित्तल, अमित गुप्ता, विनीता सिंग, रितेश अग्रवाल, पीयूष बन्सल, अझहर इक्बाल, कुणाल बहल आणि वरुण दुआ हे शोच्या चौथ्या पर्वाचे शार्क्स असतील.