७६ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची सध्या सर्वत्र चर्चा आहे. १६ मेपासून या फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल हा जगातील सर्वात मोठा फिल्म फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो. या फिल्म फेस्टिव्हलला जगभरातील नामवंत कलाकार हजेरी लावतात. यंदा हा फिल्म फेस्टिव्हल स्पेनमध्ये संपन्न होत आहे. या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर नुकतीच ‘शार्क टॅंक इंडिया’च्या जजने हजेरी लावली आणि या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारा तो पहिला भारतीय व्यावसायिक ठरला.
कान्स फिल्म फेस्टिव्हलचे अनेक फोटो सध्या समोर येत आहेत. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, आलिया भट्ट, सारा अली खान अशा अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी हजेरी लावली. तर या पाठोपाठ आता ‘शार्क टॅंक इंडिया’चा परीक्षक अमन गुप्ता या फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थित होता. तो त्याच्या पत्नीबरोबर या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला. एक पोस्ट लिहीत त्याने सोशल मीडियावरून ही माहिती चाहत्यांशी शेअर केली.
अमनने त्याचे व त्याच्या पत्नीचे कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक खास पोस्ट लिहिली. त्याने लिहिले, “कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय व्यावसायिक मी ठरल्याचा मला आनंद आहे. कधीकधी तुम्ही स्वप्ने पाहता आणि ती खरी होतात. तर कधीकधी, तुमच्या आयुष्याबाबत देवाच्या काय योजना आहेत, हे तुम्हाला माहीतही नसते. पण कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मी कधीतरी हजेरी लावेन याचा मी कधीही विचार केला नव्हता. पण आता मी तो अनुभवत आहे याचा मला खूप आनंद आहे. मी नेहमीच ऐश्वर्या राय आणि इतर सेलिब्रेटीजना या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर चालताना पाहिले आहे. मलाही ही संधी कधीतरी मिळेल असे मला कधीही वाटले नव्हते. जर मी हे करू शकतो, तर तुम्हीही करू शकता.”
या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना अमन गुप्ताने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर त्याच्या पत्नीने आकाशी रंगाचा खड्यांनी डिझाईन केलेला गाऊन परिधान केला होता. आता त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत.