‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाच्या सर्वात लोकप्रिय शार्क्सपैकी एक असलेल्या नमिता थापर सध्या काही वैयक्तिक समस्यांमुळे अडचणीत सापडली आहे. सोशल मीडियावर नमिता थापरची बदनामी करणारी पोस्ट तिच्या घरातील सुशिक्षित मोलकरणीने केल्याचं उघड झालं आहे. नमिताने स्वतः ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.
नुकतंच नमिता थापरच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती, या पोस्टमध्ये नमिताच्या मुलाने आपल्या आईची बदनामी केली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते की, “मी नमिताचा मुलगा आहे. मी फक्त जगाला हे दाखवू इच्छितो की तुम्ही टीव्हीवर ज्या व्यक्तीला पाहता ती व्यक्ती खऱ्या आयुष्यात तशी नाही. तिला लवकरात लवकर अनफॉलो करा. योग्य वेळ आल्यावर मी याचा खुलासा नक्कीच करेन.” इतकंच नाही नमिताच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या खाली ‘वाईट आई आणि वाईट पत्नी’ असंही लिहिल्याचं आढळलं.
आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर नव्हे तर OTT वर अक्षय कुमारचा बोलबाला; सर्वाधिक पाहिले गेलेले तीन चित्रपट खिलाडी कुमारचेच
ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर खुद्द नामिताने यावर स्पष्टीकरण देत याविषयी ट्वीट केलं. नमिताने ट्वीटमध्ये लिहिलं की, “एखाद्याबद्दलचा द्वेष ही गोष्ट लोकांसाठी आणि जगासाठी फार घातक आहे. एका सुशिक्षित मोलकरणीने माझा फोन चोरला आणि सोशल मीडियावर माझ्याविषयी अशी पोस्ट शेअर केली. मी एक सेलिब्रिटी आहे आणि त्याचीच ही किंमत मला चुकवावी लागत आहे. याबद्दल मी तुमची माफी मागते.”
नमिताच्या या ट्वीटनंतरही लोकांचा यावर विश्वास बसत नाहीये. त्यांनी ट्वीट करत नमिताला चांगलंच ट्रोल केलं आहे. “आजच्या काळात मोबाईलचा पासवर्ड आपल्या मुलाला किंवा जोडीदाराला सुद्धा ठाऊक नसतो, अशात मोलकरणीला कसं काय ठाऊक असेल?” असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नमिता सध्या ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. ती एमक्योर फार्मास्यूटिकल्स या कंपनीची डायरेक्टर आहे.