‘शार्क टँक इंडिया’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमात अनेक छोटे-मोठे उद्योजक आपल्या व्यावसायिक कल्पना घेऊन येतात आणि शार्क्स त्या व्यवसायात, कंपनीत गुंतवणूक करायची की नाही हे ठरवतात. सध्या या कार्यक्रमाचं तिसरं पर्व जोरदार सुरू आहे. नुकतंच या पर्वात एक निवृत्त सैनिक आपल्या कोट्यवधींच्या कंपनीसाठी सहभागी झाला होता.
सुरक्षा दलातून निवृत्त झाल्यानंतर अनेक सैनिक पोलीस किंवा इतर सुरक्षा क्षेत्रात काम करतात. तर काही सैनिक निवृत्तीनंतरचे दिवस घरीच आरामात घालवतात. पण एक असा निवृत्त सैनिक ‘शार्क टँक इंडिया’च्या तिसऱ्या पर्वात पाहायला मिळाला, ज्याने स्वतःची कोट्यवधींची कंपनी उभी केली आहे. या निवृत्त सैनिक व व्यावसायिकाचं नाव आहे अनिल मलिक. ‘शार्क टँक इंडिया’च्या तिसऱ्या पर्वात अनिल मलिक यांची धमाकेदार एन्ट्री झाली. अचानक लष्कराच्या वेशातील काही तरुणांनी ‘शार्क टँक इंडिया’च्या मंचावर एन्ट्री केली. मागे बॉम्ब, गोळीबारचा आवाज, यामुळे शार्क्स देखील थोडे घाबरले. पण नंतर काहीही झालं नाही म्हणत अनिल मलिक यांनी एन्ट्री घेतली.
हेही वाचा – किरण रावच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने भारावली मराठी अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली, “अजून काय हवं…”
अनिल यांच्या कंपनीचं नाव आहे Spec Ops (Special Operations). ही कंपनी सैनिकांच्या गरजेनुसार कपडे डिझाइन करते. अनिल यांनी ‘ऑपरेशन पराक्रम’, ‘ऑपरेशन रक्षक’ आणि ‘ऑपरेशन विजय’ (कारगिल)मध्ये भाग घेतला होता. त्यांनी देशाच्या संरक्षणात महत्त्वाचे योगदान दिले. २००२मध्ये लष्कराने अनिल यांना एक संधी दिली, ती म्हणजे यूएस स्पेशल फोर्समध्ये प्रशिक्षण देण्याची. अनिल यांनी ही संधी स्वीकारली. यावेळी त्यांनी एक गोष्ट हेरली; ते म्हणजे यूएस आर्मीकडे अनेक खास कपडे व साधने होती. तेव्हा अनिल यांना वाटलं की, आपल्याकडेही अशाप्रकारची कपडे व साधने असतील तर सैनिकांना त्याची खूप मदत होईल. या कल्पनेतून त्यांनी Spec Ops ही कंपनी उभारली.
ऑपरेशन्स व सैनिकांच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादन तयार करणे हे Spec Ops कंपनीचं उद्दिष्ट आहे. ही पहिली अशी कंपनी आहे, जिच्याकडे कार्गो लाइक्रा आहे; जी खूप जास्त स्ट्रेच होऊ शकते. तसेच सैनिक प्रत्येक गरजेच्या गोष्टी व्यवस्थरित्या आपल्याबरोबर ठेवण्यासाठी कार्गोला खूप पॉकेट देण्यात आले आहेत. अनिल यांच्या कंपनीने अशाप्रकारची अनेक उत्पादन तयार केली असून ती १६ लाख सैनिकांपर्यंत पोहोचली आहेत.
हेही वाचा – Video: ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या लेकाचा जबरदस्त डान्स पाहिलात का? कलाकार मंडळीही म्हणाले, “खतरनाक…”
दरम्यान, सैनिकांपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांहून सामान पोहोचवले जाते. त्यामुळे त्यांची गरज पुरवठ्याद्वारे येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत त्यांना काही विशेष आवश्यक असल्यास Spec Ops सारख्या कंपनी त्यांना उत्पादन पुरवतात. याशिवाय Spec Ops कंपनी स्वतः ऑपरेशन्सनुसारही उत्पादन तयार करते. अनिल म्हणाले की, आमचे ग्राहक सरकार नसून सैनिक आहेत. कारण मी स्वतः टेंडरमध्ये सहभागी होत नाही. कारण उत्पादन डिलर्सना पुरवले जातात आणि त्यानंतर सैनिकांना दिले जाते.
पुढे शार्कने लष्कर प्रत्येक सैनिकाला किती गणवेश देतं? असं विचारलं. तेव्हा अनिल म्हणाले, “माझ्यावेळेस माझ्याकडे लष्कराने दिलेले दोन गणवेश होते. तर बाकी माझे स्वतः खरेदी केलेले २०हून अधिक गणवेश होते. हे उत्पादन फक्त सैनिकच नाही तर इतर लोकंही खरेदी करत आहेत. पण इतर लोक खरेदी करण्याची संख्या कमी आहे. जे आम्ही उत्पादन बनवतो. त्यामध्ये ट्रॅक शूट, टी-शर्ट, शॉर्ट्स, सॉक्स, टोपी, हिवाळी टोपी हे उत्पादन आहेत. यांचं मार्केट साइज जवळपास १८०० कोटी रुपये आहे. आता कंपनीकडे ३०० हून अधिक जास्त एसकेयू आहे. पूर्वी लोक स्वस्त उत्पादने खरेदी करू इच्छित होती. पण आता दर्जेदार उत्पादने अधिक खरेदी केली जातात.”
ही कंपनी एक मोठा ब्रँड होऊन प्रत्येकाला हे उत्पादन उपलब्ध करून देण्याचा हेतू अनिल यांचा आहे. शार्क टँकमधून मिळणाऱ्या मार्केटिंगसह ते D2C मार्केटमध्ये स्केल करणार आहेत. गेल्या वर्षी २०२२-२३मध्ये त्यांच्या कंपनीने ६.२६ कोटी रुपयांची विक्री केली होती. त्याआधी २०२१-२२मध्ये ५.६ कोटी रुपयांचा महसूल होता. तर २०२०-२१मध्ये कंपनीने २.९५ कोटी रुपये कमावले होते. सध्या ही कंपनी बूटस्ट्रॅप्ड असून फायदेशीर देखील आहे. यंदा २०२३-२४मध्ये या कंपनीचे उत्पन्न सुमारे ८ कोटी रुपये असू शकते, असं अनिल म्हणाले. या कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे उत्पादन म्हणजे कार्गो; ज्यातून सुमारे ३५ टक्के महसूल मिळवते. तर ३५ ते ४० टक्के महसूल वेगवेगळ्या प्रकारच्या टी-शर्टमधून येतो.
हेही वाचा – मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या लग्नाला झाले ३ महिने पूर्ण, ‘असा’ साजरा केला दिवस, पाहा फोटो
अनिल यांनी आपल्या कंपनीसाठी शार्क्सकडून ४० कोटी रुपयांच्या व्हॅल्युएशनवर २ टक्के इक्विटीच्या बदल्यात ८० लाख रुपये मागितले होते. बऱ्याच चर्चेनंतर २९ कोटींच्या व्हॅल्युएशनवर अमन गुप्ता आणि अमित जैन यांनी मिळून २ टक्के इक्विटीच्या बदल्यात ४० लाख रुपये आणि उर्वरित ४० लाख रुपये २ वर्षांसाठी १२ टक्के दराने कर्ज म्हणून अशी ऑफर दिली. अनिल यांनी अमन व अमित यांची ही ऑफर स्वीकारली. यानंतर सगळ्या शार्क्सनी अनिल यांना सॅल्यूट केलं.