मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री व निर्माती शर्मिष्ठा राऊत सध्या चर्चेत आहे. ‘नाच गं घुमा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती शर्मिष्ठासह स्वप्नील जोशी, परेश मोकाशी व मधुगंधा कुलकर्णी यांनी केली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यानिमित्तानं शर्मिष्ठानं ‘राजश्री मराठी’च्या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान तिनं तिच्या अभिनय क्षेत्रातल्या पहिल्या कमाईबद्दल खुलासा केला आहे.
प्रत्येकासाठी आपली पहिली कमाई नेहमीच खास असते. शर्मिष्ठासाठीही ती खास होती. या क्षेत्रात करिअरची सुरुवात केल्यानंतर तिला मानधनाचं जे पहिलं पाकीट मिळालं होतं ते तिनं आतापर्यंत जपून ठेवलं होतं; पण ते आता तिच्याकडे नाही. याचं कारण शर्मिष्ठानं उलगडलं आहे.
हेही वाचा… “आडनाव जोग आणि काटा काढता येत नाही”, बाळासाहेब ठाकरे यांचा ‘तो’ किस्सा सांगत अनंत जोग म्हणाले…
शर्मिष्ठा राऊत म्हणाली, “मी जेव्हा ज्युनिअर आर्टिस्ट होते. तेव्हा मला २५० रुपयांचं मानधन मिळालं होतं. ते पाकीट मी गेल्या काही एक ते दीड वर्षापूर्वीपर्यंत माझ्याकडे जपून ठेवलं होतं. ते पाकीट सतत आठवत करून देत होतं की जमिनीवर राहा. म्हणजे काहीही झालं तरी तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजेत. माझा कायम याच्यावर विश्वास आहे की, जे माझ्या करिअरमध्ये घडतंय ते माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांमुळे घडतंय आणि ज्या वेळेस ते मला बघणं बंद करतील आणि त्यांना जेव्हा मी आवडेनाशी होईन तेव्हा माझं अभिनयाचं दुकान आपोआप बंद होणार आहे म्हणजे मग मी कितीही प्रतिभावान असू दे त्यानं काहीच होत नाही.”
शर्मिष्ठा पुढे म्हणाली, “ते पाकीट मी जपून ठेवलं होतं. पण आता एक ते दीड वर्ष झालं ते पाकीट माझ्याकडे नाहीय. माझा भाऊ ललित प्रभाकर यानं ‘आनंदी गोपाळ’ नावाचा सिनेमा केला आणि तो बघितल्यानंतर मी भारावून गेले होते आणि तेव्हा मी त्याला म्हटलं की, भावा याच्यापेक्षा भारी तू काम करशील. अजून चांगल्या भूमिका येतील त्या तू करशील; पण ही जी भूमिका तू केलीस, ती खूपच कमाल आहे.”
हेही वाचा… “सायली अर्जुनच्या प्रेमात पडली”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाली…
“तेव्हा मी त्याला म्हटलं की, एक मोठी बहीण म्हणून मला तुला एक बक्षीस द्यायचंय आणि तेव्हा मी ते पाकीट आणलं. मी त्याला म्हटलं की, हे २५० रुपयांचं पाकीट ही माझी पहिली कमाई आहे,” असं शर्मिष्ठा म्हणाली.
शर्मिष्ठा पुढे म्हणाली, “तेव्हा तो म्हणाला की, अगं ताई, हे पाकीट मला नको देऊ. ही तुझी कमाई आहे. त्यावर मी त्याला म्हटलं की, हे तुझ्याकडे ठेव. मला माहितेय की, हे पाकीट जितकं मी जपून ठेवलंय तेवढंच तू आयुष्यभर जपून ठेवशील. त्यामुळे आता त्याच्याकडे ते पाकीट आहे आणि मी त्याला ते बक्षीस म्हणून दिलंय. मला त्याचं ते काम खूप आवडलं होतं आणि मी माझ्या भावासाठी इतकं तर करूच शकते.”