अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ही टेलिव्हिजन आणि चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. संवेदनशील भूमिका असो अथवा नकारात्मक; तिने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. आता ती एका नवीन इनिंगला सुरुवात करणार असल्याचं तिने सांगितलं.
शर्मिष्ठा गेल्या दिवस दिवसांपर्यंत ‘अबोली’ मालिकेत काम करत होती. मात्र काही दिवसांपूर्वी तिने या मालिकेतून एग्झिट घेतली. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता लवकरच एका नव्या भूमिकेत ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ती अभिनेत्री म्हणून नाही तर निर्माती म्हणून आपल्याला दिसणार आहे. ती आणि तिचा नवरा तेजस यांनी मिळून नवं प्रोडक्शन हाऊस सुरु केलं असून या माध्यमातून ते मालिकांची निर्मिती करणार आहेत.
आणखी वाचा : उर्मिला निंबाळकरने मालिकांमध्ये काम करणं का थांबवलं? पडद्यामागील वास्तव उघड करत म्हणाली, “आयुष्यच नसणं…”
शर्मिष्ठाने नुकताच ‘राजश्री मराठी’शी संवाद साधला. यावेळी तिने हा खुलासा केला. ती म्हणाली, “आमची नवी मालिका एका मोठ्या चॅनलवर प्रसारित होणार असून लवकरच या मालिकेची घोषणा केली जाईल. खूप आधीपासून माझं निर्माती होण्याचं स्वप्न होतं आणि आता ते पूर्ण होतंय. तेजसने दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि साथीमुळे हे शक्य झालं आहे. मी आता निर्माती जरी झाले असले तरीही अभिनयापासून लांब जाणार नाही. अभिनेत्री म्हणून मी प्रेक्षकांच्या भेटीला येणारच आहे.”
हेही वाचा : Photos: ‘बिग बॉस’ मराठी फेम सई, मेघा आणि शर्मिष्ठाचं रियुनियन
शर्मिष्ठाने दिलेल्या या बातमीमुळे तिचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. तर सध्या सोशल मीडियावरून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसतोय. त्यामुळे आता ती त्यांच्या नव्या मालिकेची घोषणा कधी करणार आणि त्यात कोण कलाकार दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.