अलीकडच्या काळात बरेच लोकप्रिय कलाकार छोट्या पडद्याकडे वळत असल्याचं पाहायला मिळत आहे. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे, स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर, सुबोध भावे, संतोष जुवेकर, स्पृहा जोशी असे एकामागून एक लोकप्रिय कलाकार मालिका विश्वात एन्ट्री घेत असल्याचं गेल्या काही वर्षांत पाहायला मिळालं. आता लवकरच मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री व निर्माती म्हणून ओळखली जाणारी शर्मिष्ठा राऊत ‘स्टार प्रवाह’च्या प्रसिद्ध मालिकेत पुन्हा एकदा एन्ट्री घेणार आहे.

सध्याच्या घडीला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सगळ्याच मालिकांमध्ये टीआरपीसाठी चढाओढ चालू आहे. ‘अबोली’ ही मालिका दररोज रात्री १०:३० वाजता वाहिनीवर प्रसारित केली जाते. ही मालिका २०२१ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता सचित पाटील व अभिनेत्री गौरी कुलकर्णी यांनी ‘अबोली’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मालिका सुरू झाल्यावर यामध्ये अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने नीता सुर्वे हे पात्र साकारलं होतं. मात्र, शर्मिष्ठा राऊतने निर्माती होण्याचा निर्णय घेतल्यावर डिसेंबर २०२२ मध्ये ‘अबोली’ मालिका सोडली होती आणि ‘झी मराठी’वर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सुरू केली. यानंतर मालिकेत मीनाक्षी राठोडची वर्णी लागली होती.

हेही वाचा : Video : शशांक केतकरच्या तक्रारीनंतर एका रात्रीत BMCची कारवाई, आभार मानत म्हणाला, “फक्त तोच भाग नाही, अख्खी मुंबई…”

मीनाक्षीने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आता या व्यक्तिरेखेचा निरोप घेत असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा शर्मिष्ठा राऊतची मालिकेत एन्ट्री घेतली आहे. मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये शर्मिष्ठा राऊतची झलक स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : TRPच्या शर्यतीत टॉप ५ मध्ये असणारी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘ठरलं तर मग’ पुन्हा अव्वल, तर दुसऱ्या स्थानी…

दरम्यान, ‘अबोली’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत आठव्या स्थानावर आहे. ही मालिका रात्री उशिरा प्रसारित होत असूनही सध्या प्रेक्षकांकडून मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतबद्दल सांगायचं झालं, तर ‘झी मराठी’ वाहिनीवर सध्या चालू असणाऱ्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या दोन्ही मालिकांची निर्मिती शर्मिष्ठा व तिच्या नवऱ्याने मिळून केली आहे. याशिवाय बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या निर्मितीची जबाबादारी सुद्धा शर्मिष्ठाने यशस्वीपणे हाताळली होती. सध्या प्रेक्षक शर्मिष्ठाला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहता येणार याबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.