‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नुकतीच ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. अभिनेत्री निवेदिता सराफ, मंगेश कदम, हरीश दुधाडे, प्रतिक्षा जाधव असे तगडे कलाकार मंडळी असलेली ही मालिका २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता प्रसारित होत आहे. त्यानंतर आता आणखी दोन नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत.
अभिनेत्री मृणाल दुसानिस, विजय अंदलकर, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे यांची नवी मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ १६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. त्यानंतर अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘तू ही रे माझा मितवा’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २३ डिसेंबरपासून ‘तू ही रे माझा मितवा’ मालिका रात्री १०.३० वाजता पाहायला मिळणार आहे. यामध्ये शर्वरी ईश्वरी देसाईच्या आणि अभिजीत अर्णवच्या भूमिकेत दिसणार आहेत. याच मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या सोशल मीडियावर ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सुरुवातीला ईश्वरी ट्रॅफिक असल्यामुळे गाड्यांवरून उड्या मारत-मारत जाताना दिसत आहे. यावेळी तिला अनेकजण ओरडतात. पण ती अस्थमाचा पंप दाखवून इमर्जन्सी असल्याचं सांगते. पुढे ईश्वरी नेमकी अर्णवच्या गाडीवर पडते आणि तिच्या हेल्मेटमुळे गाडीची काच फुटते. यामुळे अर्णव भडकतो. तेव्हा ईश्वरी मेडिकल इमर्जन्सी असल्याचं सांगते. पण तरीही अर्णव तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, “या काचेची किंमत काय आहे? तुला माहित आहे का?” यावर ईश्वरी म्हणते, “एखाद्याच्या जीवापेक्षा कमी असेल ना सर. हवं तर मी नुकसान भरून देते. बोला पैसे?”
पुढे अर्णव म्हणतो, “५० हजार टाक.” ५० हजार ऐकून ईश्वरीला धक्का बसतो. तेव्हा अर्णव म्हणतो, “शक्य नाही ना. लायकी नसताना बोलायचं नाही, कळलं.” त्यावर ईश्वरी माफी मागून म्हणते, “आता माझ्याकडे पैसे नाहीयेत. पण मी देणार, नक्की देणार.” तितक्यात अर्णवला गाडीवर पडलेलं ईश्वरीचं लॉकेट दिसतं. तेव्हा अर्णव म्हणतो, “आधी पैसे द्यायचे. मग लॉकेट घेऊन जायचं.” यावर ईश्वरी म्हणते, “देईनच. हम इंदौरसे है उधार देते भी नही और रखते भी नही.” ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेच्या या नव्या प्रोमोने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “प्रोमोचा शेवटचा डायलॉग व्वा. काय अभिनय केला. जबरदस्त.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “प्रोमो मस्त आहे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, कडक प्रोमो. चौथ्या नेटकऱ्याने मालिकेचं कौतुक करत. मालिकेच्या वेळबाबत खंत व्यक्त केली आहे.
हेही वाचा – गरिबांचा रणवीर सिंह म्हणणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “माझ्यासाठी ट्रोलिंग…”
दरम्यान, ‘तू ही रे माझा मितवा’ मालिका ‘इस प्यार को क्या नाम दूं’ या हिंदी मालिकेचा रिमेक आहे. या मालिकेत शर्वरी जोग, अभिजीत आमकर व्यतिरिक्त ऋतुजा देशमुख, सुरभी भावे पाहायला मिळणार आहेत. तसंच या नव्या मालिकेत झळकणाऱ्या बऱ्याच कलाकारांची नावं गुलदस्त्यात आहेत.