‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कुन्या राजाची गं तू राणी’ ऑफ एअर झाली आहे. काल, १६ मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. आता या मालिकेची जागा ‘साधी माणसं’ ही नवी मालिका घेणार आहे. उद्या, १८ मार्चपासून शिवानी बावकर व आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘साधी माणसं’ संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे. सध्या ‘कुन्या राजाची गं तू राणी’ मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर पोस्ट लिहित आतापर्यंतचा प्रवास चाहत्यांबरोबर शेअर करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८ जुलै २०२३पासून ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका सुरू झाली होती. अल्पावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अभिनेत्री शर्वरी जोगने गुंजा तर अभिनेता हर्षद अतकरीने कबीर ही भूमिका उत्तमरित्या साकारली. त्यामुळेच गुंजा-कबीरच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण एक वर्षही न होता ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. गुंजा-कबीरच्या लग्नाने मालिकेचा शेवट झाला. यानिमित्ताने शर्वरी व हर्षदने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिल्या आहेत.

हेही वाचा – कबीर, गुंजाच्या लग्नात गुंडांचा हल्ला अन् मग…; ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेचा ‘असा’ झाला शेवट

शर्वरीने गुंजाच्या भूमिकेतील फोटोंचा व्हिडीओ शेअर करून लिहिलं आहे, “काल ‘कुन्या राजाची गं तू राणी’ मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. या मालिकेने मला खूप काही दिलं. खूप चांगली माणसं, खूप अनुभव. गुंजाकडून तर शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या…गुंजाने मला अभिनेत्री म्हणून किती समृद्ध केलं हे माहिती नाही, पण माणूस म्हणून तिने मला नक्कीच खूप गोष्टी शिकवल्या. आता प्रवास जरी थांबत असला तरी गुंजा आणि तिचं सगळं कुटुंब कायम माझ्या आठवणीत राहील. गुंजावर, या मालिकेवर, तिच्या कुटुंबावर तुम्ही जसं भरभरून प्रेम केलं तसंच प्रेम यापुढेही कराल हे नक्की.”

तसेच हर्षदने देखील कबीरच्या भूमिकेतील फोटो शेअर करत लिहिलं, “प्रत्येक कथेचा, प्रत्येक पात्राचा एक स्वतःचा प्रवास असतो…कबीरचा प्रेक्षकांबरोबरचा प्रवास आता संपला आहे…आजपर्यंत साकारलेल्या पात्रांमधील कबीर हे पात्र सर्वात कठीण होतं. खूप खूप धन्यवाद ‘स्टार प्रवाह’ तुम्ही मला संधी दिल्याबद्दल. कबीर व ‘कुन्या राजाची गं तू रानी’ हे प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील याची मला खात्री आहे. लवकरच मी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येईन, याची देखील मला आशा आहे.”

हेही वाचा – खुशखबर! सिद्धू मुसेवालाच्या ५८ वर्षांच्या आईने दिला गोंडस मुलाला जन्म, वडील फोटो शेअर करत म्हणाले…

दरम्यान, ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेत शर्वरी, हर्षद व्यतिरिक्त पूर्णिमा डे, समिधा गुरु, सविता मालपेकर, वसुधा देशपांडे, वनश्री पांडे, राजन भिसे, अमोघ चंदन असे अनेक कलाकार झळकले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharvari jog and harshad atkari share emotional post after kunya rajachi g tu rani marathi serial off air pps