Shashank Ketkar : मुंबईतील रस्ते, वाहतूक कोंडी याबद्दल अनेक मराठी कलाकार नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. यापूर्वी बऱ्याच मराठी कलाकारांनी मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडीमुळे शूटिंगला पोहोचायला होणारा उशीर याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अभिनेता शशांक केतकर सुद्धा अनेक सामाजिक विषयांवर व्हिडीओ व पोस्ट शेअर करत आपलं मत मांडत असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शशांकने ( Shashank Ketkar ) काही दिवसांपूर्वीच रस्त्यावर कचऱ्याचा ढीग साचल्याचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला होता. आता अभिनेत्याने मीरा-भाईंदर परिसरातील एका रस्त्यावरचे खड्डे पाहून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा : झहीर इक्बालशी दोन महिन्यांपूर्वी ज्या घरात लग्न केलं तेच विकतेय सोनाक्षी सिन्हा; कारण नेमकं काय? जाणून घ्या

शशांक व्हिडीओ शेअर करत सांगतो, “नमस्कार, जय महाराष्ट्र! मी पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडीओ तुम्ही पाहिले असणार याची मला खात्री आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने ही पोस्ट मुद्दाम शेअर करावीशी वाटली. आपल्या राज्यात सुरू असलेलं एकंदर निर्लज्ज राजकारण, त्यांच्यावरचं प्रेशर वगैरे या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण, हे प्रेशर हँडल करून ते मार्ग काढू शकतात त्यामुळेच त्या मोठ्या हुद्द्यावर ही सगळी मोठी मंडळी बसलेली आहेत. हा प्रश्न एका चौकाचा नसून महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गावांचा, शहरांचा आणि देशातील प्रत्येक रस्त्याचा हा प्रश्न आहे.”

रस्त्याची अवस्था पाहून शशांक केतकरने व्यक्ती केली नाराजी

शशांक ( Shashank Ketkar ) पुढे म्हणतो, “या फोटोंमध्ये रस्त्याची जी काही अवस्था झालीये… ती पाहून मला राग आला, शरम वाटली. मला असं वाटलं की, ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. खरंतर गेल्या तीन महिन्यांपासून तो पुतळा लाल फडक्यामध्ये गुंडाळलेला आहे. त्या पुतळ्याचं अद्याप अनावरण झालेलं नाही. त्याचं अनावरण करण्यासाठी कोणत्या राजकारण्याची चिठ्ठी निघणार याची स्पर्धा चालू असेल. पण, या पुतळ्याच्या आजूबाजूच्या रस्त्याची अवस्था अशीच आहे. कोणत्याच शिवभक्ताला या रस्त्यामुळे अपघात झालेले बघवणार नाही.”

शशांक केतकरची पोस्ट ( Shashank Ketkar )

“जन्माष्टमीच्या निमित्ताने हा व्हिडीओ मुद्दाम टाकतोय कारण यानिमित्ताने बरेच सेलिब्रिटी येतील. या रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसरात हे सेलिब्रिटी येतील, इतक्या थरांना एवढं बक्षीस अशा बऱ्याच जाहिराती लावण्यात आल्या आहेत. त्यावर कार्यकर्त्यांचे छोटे-छोटे फोटो देखील आहेत. या दिखाव्यात जो काही खर्च होतोय त्यापेक्षा आम्हाला मूलभूत सुविधा द्याव्यात. तो रस्ता, तो चौक नीट केला नाहीतर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार आहे इतकाच माझा प्रांजळ प्रश्न आहे. हा प्रश्न मी बीएमसीला, टीएमसीला आणि मीरा-भाईंदर महापालिकेला विचारतोय कारण, तो चौक फार मोठा आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर हा चौक असून मीरारोडवरून आल्यास त्याची सुरुवात होते आणि बोरिवलीकडून आल्यास शेवट होतो. त्यामुळे या मोठ्या चौकाची अशी अवस्था असेल तर, त्या पुतळ्याचं लोकार्पण करायला येणारा राजकारणी जेव्हा येईल तेव्हा माझी एकच विनंती आहे की, तो रस्ता तसाच राहूदेत. त्यांच्या पाठीचं हाड मोडायला हवं, त्यांच्या गाडीचं चाक पंक्चर होऊदे आणि त्यांच्यासमोर अपघात व्हावा. आपण प्रत्येक थराला लाखभर रुपये बक्षीस देतो. पण, तेच पैसे इथे देऊन तो रस्ता दुरुस्त झाला पाहिजे. कारण, फक्त सण साजरे करणं म्हणजे देशाची संस्कृती जपणं असा होत नाही तर, देशातील रस्ते नीट असतील तरच संस्कृती जपेल आणि देशाचं नाव मोठं होईल.” असं शशांकने सांगितलं.

हेही वाचा : ‘बिग बॉस’मध्ये मानकाप्याची दहशत! पण, जेलमधल्या जान्हवीला घरात पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “दोन दिवसांत…”

शशांक ( Shashank Ketkar ) या व्हिडीओमध्ये शेवटी सांगतो, “सर्वांच्या वतीने मी श्रीकृष्णाच्या पायाशी, गणपती बाप्पाच्या पायाशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी एवढंच साकडं घालेन की, रस्त्यांची अवस्था नीट व्हावी. कारण, नवीन पिढी फार चोखंदळपणे राजकारणाकडे पाहतेय त्यामुळे आम्हाला गृहीत धरू नका! जय महाराष्ट्र”

दरम्यान, शशांकच्या ( Shashank Ketkar ) या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत अभिनेत्याच्या मताशी सहमती दर्शवली आहे. “सर तुमचं अगदी बरोबर आहे”, “खूप छान तुझ्या निमित्ताने आमचाही आवाज पोहोचला”, “सत्ताधारी येतात आणि जातात. सामान्य माणसाच्या आयुष्यात काही फार बदल होत नाही.” अशा कमेंट्स शशांकच्या पोस्टवर करण्यात आलेल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashank ketkar angry bad road conditions in mumbai shares video sva 00