अभिनेता शशांक केतकर(Shashank Ketkar) हा त्यांच्या उत्तम भूमिका व गाजलेल्या मालिकांसाठी ओळखला जातो. ‘होणार सून मी या घरची’, ‘हे मन बावरे’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’, ‘पाहिले न मी तुला’, ‘सोप्पं नसतं काही’ या व अशा अनेक मालिकांमध्ये काम करीत शशांकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच तो चित्रपट व वेब सीरिजमध्येदेखील दिसला आहे. सध्या तो ‘मुरांबा'(Muramba)या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करताना दिसत आहे. अभिनेता त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीदेखील ओळखला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध गोष्टींबाबत व्यक्त होताना दिसतो. नुकताच शशांकने त्याच्या सोशल मीडियावर सरकारला प्रश्न विचारत एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने त्याचा संताप व्यक्त केला आहे.

मी बारा वर्षांपूर्वी एक घर…

शशांक केतकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “मिरा रोडला मी १२ वर्षांपूर्वी एक घर घेतलंय.अजून मला ते मिळालेलं नाहीये. कारण- त्यावर सरकारचं सील आहे. कोणाबद्दल आणि कशी कॉमेडी करू? कारण- एक तर ती बिल्डिंग पाडली जाईल आणि मला कोणीतरी बांधून देईल. काय करू? बँकेकडून अधिकृतरीत्या कर्ज घेतलं होतं. ते फेडून झालेलं आहे.”

“पैसे भरून झालेले आहेत; पण घर मिळालं नाहीये. फक्त मुंबई, महाराष्ट्रातच नाही तर भारतात असे लाखो कॉम्प्लेक्स आहेत. जे उभे राहताना तिथे काहीतरी बेकायदा घडतंय, हे तिथल्या तिथल्या सरकारला कळत नाही? आमच्याकडून नोंदणीचे पैसे घेताना तुम्हाला हे कळत नाही? बँकांना कर्ज देताना हे कळत नाही? आमचे पैसे जातात, घर मिळत नाहीत. आता कॉमेडी करायची आहे. कोणाबद्दल आणि कशी कॉमेडी करू? सांगा ना?”

हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, “सामान्य माणसानं काय करायचं? कष्टाच्या पैशातून घर घेण्याचं स्वप्न पाहिलं. १२ वर्षं झाली, घर बुक करून, कर्जसुद्धा फेडून झालं; पण घरचा ताबा मिळण्याची शक्यताही अजून दिसत नाहीये. सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे. दर तारखेला पुढची तारीख मिळते; पण तिथेही निकाल लागत नाही. झाडून सगळ्या राजकीय नेत्यांकडे कसे मोठे बंगले आणि अनेक गाड्या असतात? आम्हा सामान्य जनतेला हे गुपित सांगा ना! सांगा कसं जगायचं (आनंदानं, अभिमानानं व समाधानानं) तुमच्या राजकारणापायी आम्ही का-मरा?” अशी कॅप्शन देत सरकारला प्रश्न विचारला आहे.

अभिनेत्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी सहमती दर्शवीत त्यांच्या समस्या कमेंटमध्ये व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी याच कारणामुळे घर घेण्याची भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. “मला हीच भीती आहे म्हणून मी घर घेत नाहीये. आपण पैसे भरले आणि घर मिळालं नाहीच तर काय अवघडच आहे”, “खरं आहे”, “घर घेण्यासाठी एखाद्यानं त्याच्या आयुष्याची बचत लावून दिलेली असते; पण ह्या बिल्डर लोकांना काही वाटत नाही”, “माझं घरही त्याचं कॉम्प्लेक्समध्ये अडकलं आह़े. हाती असलेलं घर विकून आणि अधिकचे पैसे होम लोन काढून थोडे मोठं घर घ्यावं. आपल्या मुलांना एक चांगलं राहणीमान द्यावं. या इच्छेखातर या बिल्डिंगमध्ये घर बुक केलं आणि आता १२ वर्षं वाट बघतोय. दर महिना घराच्या कर्जाचा हप्ता तर सुरू आहेच. पण, त्याचबरोबर राहत्या घराचं भाडंपण भरावं लागतंय. मुलांचं लहानपणही आता सरलं आह़े. तिकडे कोर्ट-कचेऱ्या आपल्या नेहमीच्या पद्धतीत त्यांची कामं करत आहेत”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

अभिनेता सध्या ‘मुरांबा’ या मालिकेत अक्षय ही भूमिका साकारताना दिसत आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा असून, अभिनेता अनेक मुद्द्यांवर वेळोवेळी व्यक्त होत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळते.