Shashank Ketkar Welcomes Baby Girl : शशांक केतकरने यंदा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याच्या तमाम चाहत्यांना तो लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. शशांक व त्याची पत्नी प्रियांका ढवळे यांनी सुंदर असं मॅटर्निटी फोटोशूट करत लवकरच आई-बाबा होणार असल्याचं सर्वांना सांगितलं होतं. यानंतर संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. शशांक मुलगा होणार की मुलगी याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता अभिनेत्याने घरी ‘लक्ष्मी’चं आगमन झाल्याची गोड बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
शशांक केतकरला मुलगी झाली आहे. “आता खऱ्या अर्थाने कुटुंब पूर्ण झालं. घरात लक्ष्मी आली…” असं म्हणतं अभिनेत्याने त्याच्या चिमुकल्या लेकीचं नाव देखील जाहीर केलं आहे.
शशांक केतकरने लेकीचं नाव काय ठेवलं?
शशांकने वैयक्तिक आयुष्यात ४ डिसेंबर २०१७ मध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेबरोबर लग्न केलं. शशांक व प्रियांका यांनी २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं होतं. अभिनेत्याच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद असं आहे. आता ‘हम दो हमारे दो’ असं म्हणत शशांकने त्याच्या लेकीचं नाव ‘राधा’ ठेवलं असल्याचं जाहीर केलं आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कौटुंबिक फोटो शेअर केला आहे. यावर प्रियांका, शशांक, ऋग्वेद, राधा अशी चौघांची नावं लिहिल्याचं पाहायला मिळत आहे.
शशांकने मुलगी झाल्याची गोड बातमी देताच नेटकऱ्यांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मराठी कलाकारांसह अभिनेत्याच्या चाहत्यांनी प्रियांका आणि शशांक यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, शशांकच्या ( Shashank Ketkar ) कामाबद्दल सांगायचं झालं, चित्रपट, नाटक, मालिका, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘मुरांबा’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. या मालिकेला प्रेक्षकांची सुद्धा चांगली पसंती मिळत आहे. शशांकसह या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर प्रमुख भूमिकेत झळकली आहे.